राज्यात एकीकडे राजकीय गोंधळ सुरु असताना दुसरीकडे मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी तुलना केली आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांच्या या विधानावर सर्वच स्तरातून निषेधाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याच विधानावरून आता शिंदे गटातील आमदार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पिंपरी- चिंचवड शहरात लघु उद्योग संघटना, उद्योजक मेळाव्या निमित्त आले होते. तेव्हा ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले उदय सामंत?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी तुलना केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा होत असताना, प्रतिक्रिया येत असताना त्यावर बोलताना उदय सामंत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे देशाच आराध्य दैवत आहेत. राज्यपाल यांनी वक्तव्य काय केल हे माहीत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्याबद्दल बोलताना आदराने आणि सन्मान बोललं पाहिजे ही महाराष्ट्राची संस्कृती असल्याचं सामंत यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर देखील उदय सामंत टीका केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करण्या इतकं आपल्या देशांत कोणीही मोठं नाही. राहुल गांधी आपल्या यात्रेमध्ये भारत जोडण्यासाठी नाहीतर स्वतःच वजन कमी करण्यासाठी चालत आहेत अशी खोचक टीका उदय सामंत यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे.

काय म्हणाले होते राज्यपाल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.