शिरुर: आपल्या मैत्रीची यादगार आठवण राहावी. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी व पर्यावरण संवर्धनाचा भाग म्हणुन येणाऱ्या पिढीला स्वच्छ हवा व हिरवळ अनुभवता यावी याकरिता तब्बल २९ वर्षांनी निमित्ताने एकत्रित आलेल्या शिरुर येथील विद्याधाम प्रशालाच्या सन १९९३ च्या इयत्ता १० वी च्या तुकडीतील विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी ५० झाडे शहरातील डोंगरावर लावली.
शहरातील शिरुर देवराई सह्याद्रीचा वतीने पुणे नगर डोंगरावर हॉटेल अंबिकाच्या मागील वनखात्याचा डोंगरावर झाडांचे विशेषत फळझाडांचे बन उभे राहात आहे. या ठिकाणी विद्याधाम प्रशालेच्या सन १९९३ च्या दहावीच्या तुकडीतील विद्यार्थ्यानी ५० फळझाडे याठिकाणी लावून पर्यावरण संवर्धनाचा जागर केला. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांची शिवतारा कृषि पर्यटन केंद्रावर शाळा भरली. यावेळी अनिता भोगावडे यांनी सुंदर रांगोळी काढली होती. याप्रसंगी सर्वांचे औक्षण करुन व गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.
सकाळी ११ वाजता शाळेची घंटा वाजली त्यानंतर सर्व मित्र-मैत्रिणी यांनी शाळेची प्रार्थना व राष्ट्रगीत म्हटले. यावेळी प्रशालेत नित्यनेमाने सांगण्यात येणाऱ्या दिनविशेष ही सांगण्यात आला. या बॅचचे माजी विद्यार्थी व एनसीबीचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर पुन्हा नव्याने प्रत्येकाने आपली ओळख करुन दिली. प्रत्येकाने ओळख करुन दिली की दहावीतील तो किंवा ती याच्यात किती फरक पडला अशी चर्चा झडत होती .त्याचबरोबर ओळखी नंतर दहावीतील टोपणनावाने काहीनी हाक मारली. विद्यार्थी ते प्रौढ असा आपला प्रवास कसा पटकन झाला याचे चित्र सर्वांच्या मनपटलावर उमटत होते.
कार्यक्रमस्थळी शाळा व शाळेत शिकविला जाणाऱ्या विषयाच्या पुस्तकांची चित्रे उपक्रमाची चित्रे यांचा असणारा फलक लक्ष वेधून घेत होता. त्याचबरोबर सन १९९० ते १९९५ या वर्षा मधील प्रसिद्ध हिंदी व मराठी चित्रपट गीते लावण्यात आल्याने सर्व जण आपल्या त्या काळातील आठवणीत हरखून गेले. विद्याधाम प्रशालेचे असणारे प्रशाला गीताचे सामूहिक गाण यावेळी करण्यात आले या गीतात ' जगात जावू कोठे जरी ही गर्जत ठेवू विद्याधाम ' ही ओळ आल्यानंतर अतिशय अभिमानाने व खड्या आवाजात या ओळी सर्वानी म्हणाल्या. त्याच वेळी आपण विद्याधाम प्रशालेचे विद्यार्थी असल्याचा अभिमान व कृतार्थता प्रत्येकाचा चेहरावर झळकत होती.
यावेळी विविध गुणदर्शन कार्यक्रमात अनेकांनी आपली कला सादर केली. अमित घावटे, अनिता भोगावडे, ॲड श्रीरंग कडवेकर, माजी सरपंच वर्षा काळे, डॉ धीरज सुराणा, परेश बोरा, निलेश लटांबळे, अजित मोरे, सुजाता नरवडे, गोरक्षनाथ निघुल, तुषार दळवी, ॲड वीरेंद्र सावंत यांनी मनोगते व्यक्त केली. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यानी हम होगे कामयाब हे समूहगीते सामूहिकपणे म्हटले. त्यामुळे वातावरण अधिकच चैतन्यमय व उत्साही झाले.
सर्वाना या स्नेहसंमेलनाची आठवण म्हणून विद्याधाम प्रशाला ९३ असा उल्लेख असणारा बिल्ला, आकर्षक टोपी, गृप फोटो, कार्यालयीन बॅग व मिठाई बॉक्स , सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने झालेल्या मित्रांशी संवाद व सहवास याची उर्जा जीवनात येणाऱ्या अनेक संकटाना तोंड देताना टॉनिक सारखी शक्तीवर्धक ठरते हे निश्चित अशी ही उर्जा दरवर्षी गेट टू गेदरचा रुपाने घ्यायची व दरवर्षी पुन्हा नक्की भेटायच असे वचन देत सर्वानी एकमेकांचा निरोप घेतला .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश धुमाळ, परेश बोरा, अतुल बोथरा, स्वाती थोरात, विद्या वाघमारे, वर्षा काळे, विनय संघवी, प्रशांत थोरात, चंद्रकांत कनिंगध्वज, सचिन घोडके, विनोद बोथरा, गणेश खोले, मध्यकांत पानसरे यांनी विशेष पुढाकार घेतला. यावेळी प्रास्ताविक विनय संघवी सुत्रसंचालन विद्या सोळसे, स्वाती थोरात यांनी केले आभार सतीश धुमाळ यांनी मानले.