पश्चिम बंगाल: नारळ फुटल्यानंतर एका दहा वर्षाच्या मुलीच्या मृत्यू झाला आहे. या घटनेच्या तपासादरम्यान धक्कादायक सत्य उघडकीस आले. फुटला तो नारळ नव्हता तर बॉम्ब होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मृत मुलीच्या घरातच हा सर्व प्रकार घडला. स्फोटानंतर मृत मुलीच्या घरातील अनेक नातेवाईक फरार झाले आहेत. 

पश्चिम बंगालमधील परगणा जिल्ह्यातील बसीरहाट येथे हा स्फोट झाला. ही घटना मीनाखान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चापली ग्रामपंचायतीच्या बकचोरा भागातील आहे. या स्फोटात एका 10 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर तिचे नातेवाईक फरार झाले आहेत. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलीस या फरार नातेवाईकांचा शोध घेत आहेत. 

नारळ समजून बॉम्ब उचलला

सोहाना खातून (वय 10) असे मृत मुलीचे नाव आहे. सोहाना तिच्या मामाच्या घरी गेली होती. यावेळी ती किचनमध्ये काहीतरी आणण्यासाठी गेली होती. यावेळी तिने नारळ समजून बॉम्ब उचलला. हा बॉम्ब तिच्या हातातून खाली पडला आणि मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकून घरातील लोक आणि परिसरातील लोक घटनास्थळी दाखल झाले.

जखमी अवस्थेत मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घरातून मोठ्या प्रमाणात बॉम्ब हस्तगत केले आहेत. मुलीचा मामा अबुल हुसेन यानेच बॉम्ब घरात ठेवल्याचा पोलिसांना संशय आहे. स्फोटानंतर हसेन घटनास्थाळावरुन फरार झाला. हुसेन हा गुन्हेगारी पाश्रवभूमीचा असल्याची माहिती देखील समोर येत आहे.