रांजणगाव गणपती: वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या वाहतूक विभागानं मोठा दणका दिला आहे. बेशिस्त वाहनचालकांकडून अवघ्या नऊ महिन्यात पोलिसांनी तब्बल ८४ लाखांचा दंड वसूल केला आहे. रांजणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी ही माहिती दिली.
वाहन चालकांच्या स्वयंशिस्तीच्या अभावामुळे दिवसेंदिवस वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणात वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या वाहतूक विभागाच्या वतीने जानेवारी 2022 ते सप्टेंबर 2022 या काळात वाहतुकीचे नियमांची ऐशीतैशी करणाऱ्या तब्बल 13 हजार वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांच्याकडून सुमारे 84 लाखांचा दंड वसूल केला असुन ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक नो पार्किंगच्या एक हजार वाहनांवर कारवाई करत या एकाच महिन्यात 5 लाख 61 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
याशिवाय रांजणगाव एमआयडीसी मधील अंतर्गत रस्त्यावर व पुणे - अहमदनगर रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांच्या जिवितास धोका होईल, रहदारीस अडथळा होईल अशा रीतीने वाहन पार्क करणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे अशा प्रकारचे अपराध करणा-या एकुन 110 वाहन चालकांवरही गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.
तसेच अनेक वाहन चालकांना समज देऊन सोडण्यात येते तरीही वाहन चालक बेशिस्तपणे वाहन चालवित आहेत. अशा बेशिस्त वाहन चालक, मालकांवरील कारवाई अधिक कठोर करण्याचा विचार वाहतूक पोलिस करीत असुन सातत्याने वाहतूक नियम भंग केल्यास अशा वाहन मालकाचा परवाना उपप्रादेशिक विभागाकडून काही महिन्यांसाठी निलंबित करता येतो. या नियमांचाही भविष्यात अवलंब करणार आहोत, असे सहायक फौजदार मारुती पासलकर यांनी सांगितले. रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळातही या बेशिस्त वाहन चालकांवरील कारवाई अशीच चालू राहणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार सुरज वळेकर आणि पोलिस हवालदार संतोष पवार यांनी दिली.