नारायणगाव: गर्भवती पत्नीच्या अपघाती मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पतीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना धोंडकरवाडी (ता. जुन्नर) येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळूहळू व्यक्त होत आहे.

नादुरुस्त रस्ता व अवजड वाहतूक यामुळे 8 महिन्यापूर्वी प्रेम विवाह करुन सुखी संसाराची स्वप्ने पहात असलेले एक कुटुंब उद्वस्त झाले आहे. या घटनेमुळे आता तरी शासनाला जाग येणार का? रस्त्यांची दुरूस्ती होणार का? ट्रॅक्टरद्वारला दोन ट्रॉल्या जोडून सुरु असलेली नियमबाह्य ऊस, मुरुम, मळी वाहतूक बंद होणार का? असा सवाल सर्व सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. पत्नीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने रमेश नवनाथ कानसकर (वय २९, राहणार धोंडकरवाडी , निमदरी ता.जुन्नर ) या तरुणाने आज पहाटे विषारी औषध पिऊनजीवनयात्रा संपवली.

धोंडकरवाडी येथील रमेश कानसकर

यांचा ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेत जमिनीचे सपाटीकरण करण्याचा व्यवसाय होता.आठ महिन्या पूर्वी विद्या जाधव (वय २२) हिच्या बरोबर त्याचा प्रेम विवाह झाला होता.विद्या ही चार महिन्यांची गर्भवती होती.१४ ऑक्टोबर २०२२ रोजी रमेश कानसकर हे धोंडकरवाडी येथून दुचाकीवरून पत्नी व सासू यांना घेऊन नारायणगाव येथे खरेदीसाठी आले होते.

पुन्हा घरी जात असताना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वारुळवाडी(ता.जुन्नर) येथे समोरून ऊस घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा धक्का दुचाकीला बसला. या मुळे विद्या खाली पडून तिच्या डोक्यावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. गर्भवती पत्नीच्या अपघाती मृत्यूमुळे रमेश कानसकर हे मानसिक तणावाखाली होते. 

मागील तीन दिवसापासून त्यांनी अन्न व पाण्याचा त्याग केला होता. अखेर (दि. 17) रोजी पहाटे त्यांनी राहत्या घरात विषारी औषध घेतले. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना जुन्नर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. या घटने मुळे हळहळ व्यक्त होत असून अपघातामुळे 8 महिन्यांपूर्वी संसार सुरु केलेल्या दाम्पत्याचा दुर्दैवी अंत झाला.