रत्नागिरी : लांजाचे फणसकिंग मिथिलेश देसाई यांनी फणसाच्या रोपांपाठोपाठ आता सीताफळांची रोपेही परदेशात पाठवली आहेत. या माध्यमातून व्यवसायाचे एक मोठे दालन देसाई यांनी खुले केले आहे.
फणसाच्या विविध जाती लावून नवी कृषिक्रांती करणारे फणसकिंग मिथिलेश देसाई यांनी २० दिवसांपूर्वीच फणसाची रोपे परदेशात पाठवली प्रथमच असा प्रयोग झाला. आता त्यापाठोपाठ त्यांनी सीताफळाची रोपेही मॉरिशसला पाठवली आहेत. सीताफळे खूपदा देशातून परदेशात गेली आहेत; पण यावेळी चक्क त्याची झालं आहे. रोपे परदेशात गेली आहेत. ज्यांनी फणसाची रोपे नेली होती, ते मॉरिशसमधील शेतकरी उदेश यांनीच ही रोपे नेली आहेत.
फणसाप्रमाणेच सीताफळाची ३०० रोपे माती व पाण्याविना पाठवण्यात आली आहेत. सात दिवस पाणी आणि मातीशिवाय राहू शकतील, अशी प्रक्रिया करून ही ३०० रोपे केवळ २ खोक्यांमधून पाठवण्यात आली आहेत. त्यांचं वजन फक्त ७ किलो इतकंच झालं आहे.
कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष करून अनेक तरुण शहराची वाट धरतात; मात्र मिथिलेश देसाई यांनी कृषी क्षेत्रावरच भर देत त्यातील नवनवे पर्याय शोधले आहेत. फणस आणि सीताफळापाठोपाठ आता लवकरच काजूची रोपे परदेशात पाठवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मुळात विविध पद्धतीच्या व्यावसायिक लागवडीतून त्यांनी उत्पन्नाचा मार्ग शोधला आहेच. शिवाय रोपांची निर्यात करून त्यांनी त्यातील आणखी एक पर्याय खुला करून दिला आहे.