औरंगाबाद : आरोग्य विभागाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविण्यात औरंगाबाद तालुका दसऱ्या क्रमांकावर असून फुलंब्री प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली . 106 % महिलांना या योजनेचा औरंगाबाद तर फुलंब्रीत 107 % महिलांना लाभ मिळाला आहे . केंद्र सरकार व राज्य सरकारने संयुक्तपणे आरोग्य विभागामार्फत प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविण्यात येते . पहिल्यांदा बाळंतपण झालेल्या महिलेला या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ दिला जातो . यात तीन टप्पे ठेवण्यात आले असून पहिल्या टप्प्यात नोंदणी करताना 1 हजार रुपये , तर सहा महिन्यानंतर 2 हजार रुपये आणि बालकाचे लसीकरण झाल्यानंतर आणखी 2 हजार रुपये असे एकूण 5 हजार रुपये या योजनेत दिले जातात . हा आर्थिक लाभ संबंधित महिलांच्या थेट बँक खात्यात दिला जातो . औरंगाबाद जिल्ह्यातील 67 हजार 67 महिलांना 33 कोटी 53 लाख 35 हजार रुपये देण्यात आले आहेत . आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांना याचा फायदा झालेला आहे