रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्याबरोबर काम करण्यासाठी वेळ आली तर पुढकार घेईन, असे सांगत जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि आरपीआय या सर्व पक्षांची मोट बांधण्याचा माझा प्रयत्न आहे, असे शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात ते बोलत होते. भविष्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये खासदार तटकरे आणि आमदार जाधव एकत्र येणार का, असा प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले, अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत; मात्र वेळ आली तर तशी भूमिका घेऊ. त्याहीपुढे जाऊन आणखी एक पाऊल टाकण्याचा विचार करत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, आरपीआय असा भेदाभेद न करता सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येकाने आपापल्या ताकदीने अपेक्षा ठेवल्या तर सगळ्यांना गोळा करण्याचा मानस आहे. शिवसेनेच्या नेत्यांना येथील वस्तुस्थिती सांगण्याची जबाबदारी माझी आहे. यासाठी माझ्याबरोबर अन्य नेते आले तर ताकद निश्‍चितच वाढेल; पण ते आपल्या जिल्ह्यात अडकून पडले तरीही रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढाकार घेणार आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर पावले उचलली जातील. जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत आमदार जाधव म्हणाले, रत्नागिरीचे आमदार शिंदे गटात गेले आहेत; पण मागील निवडणुकीत आमचेच पारडे जड राहिले. गुहागरमध्ये सर्वच्या सर्व ९ ग्रामपंचायती ठाकरे सेनेच्या ताब्यात आहेत. आता जाहीर झालेल्या निवडणुकीत ४२ पैकी ३८ ग्रामपंचायती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडेच राहतील. हेच चित्र संपूर्ण जिल्ह्यात पाहायला मिळेल.मागील निवडणुकीत विजयी झालेले काही सरंपच विकासासाठी आमदार, पालकमंत्र्यांकडे जाताना दिसतील; पण ते कायम त्यांच्याकडेच राहणार असे नाही तर काही ठिकाणी सरपंच एकटा तिकडे जाईल; पण गाव त्यांच्याबरोबर दिसणार नाही. कारण, जिल्ह्यातील कार्यकर्ता ठाकरे यांच्या पाठीशी आहे. आमदार फुटले हे कुणालाच आवडलेले नाही. भाजपचा हव्यास लोकांच्या लक्षात आलेला आहे. मुंबई महापालिकेवर त्यांचा डोळा आहे, हे सर्वसामान्यांना समजले आहे. त्यामुळे भविष्यात परिवर्तन नक्कीच घडेल. सध्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह टिकवण्याचे काम केले जाणार आहे. आमदार, खासदार गेले म्हणजे सर्वकाही गेले असे नाही. त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली. त्यांना जिंकून देणारे तुम्ही आहात. ते गेले तरीही तुम्हाला आता स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली आहे, हे कार्यकर्त्यांना पटवून देण्यात येत आहे.स्थानिक परिस्थितिवर आघाडीचा निर्णयस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी होण्यास हरकत नाही; परंतु तो निर्णय स्थानिक परिस्थितीवर अवलंबून राहील. अजून निवडणुका लागलेल्या नाहीत. त्यामुळे त्या संदर्भात एकत्र चर्चा झालेली नाही. सध्या प्रत्येक पक्ष जनाधार वाढवत आहे. जिल्ह्यात सेना प्रबळ आहे. या ठिकाणी फूट पडलेली आहे. त्या अनुषंगाने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं