रत्नागिरी : देशभरात सर्वत्र १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. बालदिनाचे औचित्य साधून अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक कार्यक्रमाची आखणी केलेली असते. विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी, छंद, विविध क्षेत्राबद्दल जाणून घ्यायची माहिती इ. अनेक गोष्टीना महत्व देऊन त्याबाबत त्यांचे विचार, अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न केले जातात.

रत्नागिरी शहरी भागामध्ये बालदिनानिमित्त जीजीपीएस इंग्लिश मिडियम स्कूल गुरुकुल रत्नागिरी येथे महिला सुरक्षा विशेष कक्षातर्फे बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना पोलीस उपनिरीक्षक श्रीमती गायत्री पाटील, रत्नागिरी यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत बालकां संबधी असणारा पोक्सो कायदा, बाल कामगार कायदा गुड टच / बॅड टच तसेच कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत असणार्‍या पोलीस काका / पोलीस दीदी या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. यासोबत विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे व बालकांसंदर्भात घडणार्‍या गुन्हयाबाबतही महिला पोलीस अंमलदारांमार्फत माहिती देण्यात आली.

त्याचप्रमाणे नवीनच रुजू झालेले पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनीही मुलांना विशेष शायराना अंदाजामध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.

मनाची निरागसता…..

हृदयाची कोमलता…..

ज्ञानाची उत्सुकता…

भविष्याची आशा.. आणि उद्याचा देश घडवणाऱ्या सर्व बालगोपाळांना, बालदिनाच्या शुभेच्छा, असे म्हटले आहे.

तसेच संकटात सापडल्यावर किंवा अचानक काही घटना घडली, आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलीस हेल्पलाईन डायल ११२ यावर कॉल करुन मदत कशी मागवावी याची देखील माहितही देण्यात आली. या बाल दिन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित इयत्ता ५ वी ते ८ वी मधील १५० विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पेनचे वितरण करण्यात आले.