राजापुर तालुक्यातील बारसू, सोलगाव, गोवळ, शिवणे परिसरातील रिफायनरी विरोधी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना तडीपारीच्या नोटीसा बजावण्यात आलेल्या असताना शनिवारी (ता.१२) पोलिसांनी गावांमधून रूट मार्च केल्याने प्रकल्प विरोधक संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पोलिस जनतेच्या संरक्षणासाठी की घाबरविण्यासाठी असा सवाल रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. 

शनिवारी (ता.१२) पोलिसांच्या काही गाड्या व बसेस बारसू, सोलगाव पंचक्रोशीत सायरन वाजवत फिरत होत्या. ज्या पोलिसांनी जनतेचे संरक्षण करायचे ते पंचक्रोशीत सायरनवाल्या गाड्या फिरवूत दहशत निर्माण करत आहेत. त्यामुळे पोलिस जनतेच्या संरक्षणासाठी की घाबरविण्यासाठी याचे उत्तर गृहमंत्र्यांनी द्यावे, असे श्री. बोळे यांनी या प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद केले आहे. रिफायनरीचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त असण्याची शक्यता आहे. प्रत्येक दडपशाहीच्या कृतीने ग्रामस्थांचा सरकारविषयीचा राग वाढत आहे. संघर्ष करण्याचा निर्धार ठाम होत आहे. शांततेच्या व संविधानिक मार्गाने स्वरक्षण करण्यास बारसू, सोलगाव पंचक्रोशी, नाटे पंचक्रोशी, नाणार परिसर, मुंबईकर ग्रामस्थ व कोकणी जनता तयार आहे. आमच्या कोकणावरील प्रेमाची सत्वपरीक्षा पहायची असेल तर आम्ही द्यायला तयार आहोत, असेही त्यांनी नमूद केले आहे.