रत्नागिरी : रेल्वे पोलिसांच्या हातावर तूरी देवून पसार झालेल्या चोरट्याला पकडण्यात अद्यापही यश आलेले नाही. पोलिसांची विविध पथके या सराईत चोरट्याच्या मार्गावर गेली आहेत. दरम्यान, हातात बेडी असताना चोरटा पसार कसा झाला? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. राजधानी एक्सप्रेससह इतर रेल्वे गाड्यांमध्ये चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्याला शनिवारी रेल्वे पोलिसांनी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून मोठ्याप्रमाणात मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले होते, अशी माहिती आता पुढे आली आहे. या चोरट्याला पकडल्यानंतर त्याला शहर पोलीस स्थानकात आणण्यात आले. मात्र रेल्वे पोलीस फिर्याद द्यायला तयार नव्हते असे चर्चिले जाते.
आरोपी पळाला
रेल्वे पोलिसांनी पकडलेला सराईत गुन्हेगार हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातला आहे. दत्तात्रय शिवाजी गोडसे (रा. सोलापूर) असे सराईत चोरट्याचे नाव आहे. पोलीस स्थानकाबाहेरील बाथरूमजवळून दत्तात्रय गोडसे हा पळून गेल्यानंतर रेल्वे पोलिसांनी आरडाओरड सुरू केली. शहर पोलीस स्थानकातून कर्मचारी धावत बाहेर आले, मात्र सराईत गुन्हेगार दत्तात्रय गोडसे हा रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देवून पळून जाण्यात यशस्वी ठरला.
पोलीस स्थानकात खळबळ
सराईत गुन्हेगार रेल्वे पोलिसांच्या तावडीतून निसटल्याने पोलीस स्थानकात खळबळ उडाली. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक विनीत चौधरी लागलीच पोलीस स्थानकात दाखल, झाले आणि रेल्वे पोलिसांसह शहर पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.
आधीही पकडले होते
ज्या डब्यात तो प्रवेश करायचा त्याठिकाणी पाहणी करून तो पुढच्या डब्यात जायचा, असे तिकिट असलेले सर्व डबे तो आधी फिरायचा आणि डल्ला कुठे मारायचा आहे याची पाहणी तो करून ठेवायचा. यापूर्वी त्याला पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर त्याची न्यायालयाने सुटका केली होती. थोडे दिवस रेल्वेतील चोऱ्यांचे सत्र थांबले होते. मात्र अट्टल गुन्हेगार "असलेला दत्तात्रय गोडसे हा पुन्हा सक्रीय झाल्यानंतर चोऱ्यांचे प्रमाण वाढू लागले. त्यामुळे रेल्वे पोलिसांचीदेखील झोप उडाली आहे.
पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या या प्रकरणात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. शहर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक सराईत गुन्हेगार दत्तात्रय गोडसे याच्या मागावर गेले आहे. मात्र त्याला पकडण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही.