शिरुर: भारताचे माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांना लहान मुलांविषयी विशेष प्रेम होते. त्यामुळे "चाचा नेहरु" म्हणुन ते लहान मुलांमध्ये प्रसिद्ध होते. त्यांची जयंती 'बालदिन' म्हणून साजरा केला जातो. परंतु वीट भट्टीच्या धुरळ्यात जीवन हरवलेल्या बालकांच्या जीवनात मात्र कसला बालदिन. विटांनी रचलेल्या भिंती, तुटक्या फुटक्या विटा लावलेल्या भिंतीवर गळक्या छताचा निवारा अंगावर फाटके कपडे आणि आर्थिक विवंचनेत गुरफटलेले कुटुंब असे हालाखीचे जीवन या बालकांच्या नशिबी आलेले...शिरुर येथील रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय संस्थेने या बालकांच्या समवेत बालदिन साजरा केला.
सगळीकडे विविध कार्यक्रमांनी बालदिन साजरा होत असताना शिरुर येथील वीट भट्टीवरच्या या बालकांनाही बालदिन काय आहे हे समजावे तसेच त्यांना आनंद मिळावा म्हणून शिरुर येथील रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने रामलिंग येथील विटभट्टी कामगार मुलांच्या वस्तीतील शाळेत केक कापुन बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना खाऊचे वाटपही करण्यात आले.
अचानक आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे ही बालके हरखून गेली. त्यांनी हे क्षण मोठ्या आनंदात व्यतीत केले. आपल्या बालकांना एवढे आनंदात पाहून पालकही भावूक झाले. समाजातील हे उपेक्षित घटक सण उत्सवाच्या आनंदापासून वंचित राहू नये म्हणून रामलिंग संस्था वर्षातील बहुतांशी सण उत्सव वीटभट्टी कामगारांच्या कुटुंबासमवेत साजरे करीत असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी सांगितले.
यावेळी कर्डिले यांनी या मुलांना पंडित जवाहरलाल नेहरू यांची ओळख व गरीब परिस्थिती मध्ये शिक्षण कसे घ्यायचे याचे महत्त्व पटवून दिले. तसेच डॉ. वैशाली साखरे यांनी व्यसन मुक्ती यावर मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रीय पर्यावरण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने या दिवसाचे औचित्य साधून या मुलांना खाऊ वाटप केले. तसेच वीटभट्टीवर काम करणाऱ्या महिलांना साडी-चोळी देण्यात आली.
यावेळी आदिशक्ती महीला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे, पोलीस मित्र संघटनेच्या कार्याध्यक्षा मिना गवारे, कायदेशीर सल्लागार वैशाली बांगर, महिला दक्षता समितीच्या सदस्या दिपाली आंबरे, राणी शिंदे, छाया हारदे, पुनम जाधव, तर्डोबाची वाडीच्या सरपंच धनश्री मोरे, सुजाता रासकर, श्रीगोंदा पंचायत समिती सदस्य कल्याणी लोखंडे, माजी सरपंच मंगल कौठाळे, ग्रामपंचायत सदस्य आशा गुंड तसेच इतर महीला मान्यवर उपस्थित होत्या.