पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून 45 मतदार संघांवर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यातील बारामती व शिरुर असे 2 मतदारसंघ निश्चित केले आहेत. या पार्श्वभूमीवर शिरुर लोकसभा मतदारसंघात विविध विकासकामांचा धडाका लावण्यात आला असून भाजपच्या मिशन शिरुरला शिंदे गटाचे बळ मिळत असल्याची चर्चा आहे.

गेल्या अडीच वर्षात शिरुरमध्ये शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना विकासकामांत डावलल्याचा आरोप सातत्याने होत होता. राज्यात सत्ताबद्दल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींना डावलून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुचविलेली विकासकामे केंद्र , राज्य सरकार आणि डीपीसी च्या माध्यमातून मार्गी लावण्यात येत आहेत. त्यामुळे बारामती जिंकण्यासाठी आणि शिरुर मतदार संघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजपला बळ मिळत आहे. पुणे जिल्ह्यात पुणे, बारामती. मावळ आणि शिरुर असे लोकसभेचे चार मतदारसंघ आहेत.

यातच शिरूर मतदार संघातील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना आगामी निवडणुकीसाठी तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यांना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचा सामना करावा लागणार आहे. मात्र यातच राष्ट्रवादीच्या अनेक कार्यक्रमांना अमोल कोल्हे यांची अनुपस्थिती राहिली आहे. तसेच मध्यंतरी ते राष्ट्रवादीवर नाराज असल्याच्या बातम्या देखील समोर येत होत्या. त्यामुळे या मतदार संघावर भाजपचे देखील मोठे लक्ष्य राहणार आहे.

तसेच बारामती लोकसभा मतदार संघावर खासदार सुप्रिया सुळे यांची मजबुत पकड आहे. त्यामुळेच भाजपने केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. अलिकडेच त्यांनी बारामतीचा दौरा केला होता. अशातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे देखील 48 जागांपैकी 45 जागा जिंकणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत मोठी रंगत बघायला मिळणार आहे.