रत्नागिरी : तालुक्यातील पावस चांदोर, नाखरे या भागात सध्या गवा रेड्याचा मुक्तसंचार करण्याचे प्रमाण वाढत असल्याने परिसरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तातडीने त्याची दखल घेऊन गव्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. पावस परिसरातील भागात पूर्वी बिबट्याचा वावर असल्याचे पाहायला मिळत होते. परंतु, सध्या बिबट्याने वावरण्याचे प्रमाण कमी केल्याने थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र आता गवा रेडा दिवसाढवळ्या संचार करत असल्याचे स्थानिकांना दिसून येत आहे. गवा रेड्याने आपला मुक्काम या परिसरात सुरू केल्याने भीतीचे सावट पसरले आहे.
ज्यादिवशी गवा दिसून आला त्यावेळी स्थानिकांना गव्याला पिटाळून लावले. या बाबत वनविभाग अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष न करता गव्याचा बंदोबस्त करावा. या संदर्भात येथील शेतकरी श्री गणेश नार्वेकर म्हणाले की, सध्या अचानकपणे गवा रेड्याने या भागात संचार सुरू केल्यामुळे भीती निर्माण झाली आहे. गवा भरदिवसा संचार करत असल्याने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तातडीने वनविभागाने गव्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करत आहोत.