मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डेमय रस्त्यांच्या त्रासाला सर्वच कंटाळले आहेत. यातून होणारे अपघात वाढतच आहे. असाच एक अपघात संगमेश्वर तुरळ येथे खासगी बस आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक झाला. हा अपघात शनिवारी दु. 3.30 वा. च्या सुमारास झाला. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी टेम्पो चालक अरविंद प्यारेलाल कुमार (25, उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद खासगी बस चालक उमेश बाबजी परब (39, गिरावळ, देवड, सिंधुदुर्ग) यांनी पोलीस स्थानकात दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पो चालक अरविंद प्यारेलाल हा गोव्याहून मुंबईच्या दिशेने टेम्पो घेवून जात होता. तुरळ येथे आल्यावर त्याचा गाडीवरील ताबा सुटला. टेम्पो विरुध्द दिशेला जावून त्याने खासगी बसला समोरुन जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात प्रवासी व दोन्ही वाहन चालक सुखरुप आहेत. मात्र दोन्ही वाहनांचे दर्शनी भागाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. खासगी बस चालक उमेश परब यांनी या अपघाताची खबर संगमेश्वर पोलीस स्थानकात दिली. पोलिसांनी टेम्पो चालक अरविंद प्यारेलाल कुमार याच्यावर भादविकलम 324, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.