पुणे: सैन्यदलातील एका जवानाबरोबर स्वत: लग्न केल्यानंतर आपल्या अल्पवयीन मुलीचेही त्याच्यासोबतच लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. लैंगिक अत्याचार असह्य झाल्यानंतर ही घटना शाळेतील आपल्या एका मित्राला या मुलीने सांगितली. त्या मित्राने एका महिला सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने थेट पोलिस ठाणे गाठून झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे गतिमान करीत आरोपी जवानाला बेड्या ठोकल्या आणि आईविरुद्धही गुन्हा दाखल केला. सागर जयराम दातखिळे (28, रा. उस्मानाबाद) असे या जवानाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी फिर्यादींच्या कार्यालयात गुरुवारी (दि. 10) एक 15 वर्षीय मुलगी आली. तिची विचारपूस केल्यानंतर पीडितेने सांगितले की, तिच्या आईने बळजबरीने तिचे लग्न सागर नावाच्या (लष्करातील जवान) एका व्यक्तीबरोबर लावून दिले आहे. बार्शी येथे एका लग्नाला गेल्यानंतर पीडित मुलीची आणि संशयित आरोपीची ओळख झाली होती. तो पुण्यात पीडित मुलीच्या घरी वारंवार येत असे. तसेच 10 ते 15 दिवस तो राहत असे. सागर ऊर्फ सागरकाका आर्मीमध्ये नोकरी करीत असल्याचे तिने फिर्यादी यांना सांगितले. तसेच त्याच्या नोकरीच्या ठिकाणी जात असल्याचेही तिने सांगितले.
सागर याचे आणि पीडित मुलीच्या आईचे अनैतिक संबंध होते. तिच्या आईने तिला सागरकाका हे तुझ्या वडिलांसारखे आहेत, मी त्यांच्यासोबत लग्न करणार आहे, असे देखील सांगितले होते. यानंतर सागरकाकाने पीडित मुलीच्या आईला कुुंकू लावून तिला मंगळसूत्र देखील घातले होते. त्यानंतर पीडित मुलगी आईने सांगितल्यानुसार त्याला पप्पादेखील म्हणत होती.
अटक करण्यात आलेला आरोपी हा लष्करात कार्यरत आहे, तर पीडित मुलीचे वडील घर सोडून गेलेले असून पीडिता ही आईबरोबर राहते. सध्या ती एका शाळेत शिकत असून फिर्याद दाखल होताच तत्काळ कारवाई करीत पीडित मुलीच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र लांडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चंदननगर पोलिस ठाणे