मंडणगड : तालुक्यातील व्यापारी वर्ग कोरोना महामारी व त्यानंतर नादुरुस्त असलेल्या आंबेत म्हाप्रळ पुलामुळे प्रचंड आर्थिक नुकसान सहन करत आहेत. पुलावरील वाहतूक गेली तीन वर्ष विविध तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे दुरुस्तीविना रखडली आहे. कोरोना नंतरच्या या संकटामुळे येथील व्यापारच खुंटल्याचे येथील व्यापारी पूर्णपणे हतबल झाले आहेत. त्यामुळे व्यापारी संघटनेने साखळी उपोषणाचा इशारा निवेदन पत्राद्वारे प्रशासनाला दिला आहे.

नादुरुस्त पुलाचे काम गेली दोन वर्षे रखडलेले आहे. यावर प्रशासन कोणतीही भूमिका न घेता चालढकल करत आहे. यामुळे मंडणगड तालुक्यातील जनतेला व व्यापाऱ्यांना खूप हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत. प्रशासनाविरुद्ध जनतेतून तीव्र नाराजी उमटली आहे. आंबेत पुला संदर्भात येत्या आठ दिवसात योग्य ती कार्यवाही करून मंडणगडमधील जनतेला या समस्येतून मुक्त करावे अन्यथा पुढील आठ दिवसानंतर मंडणगडमधील सर्व व्यापाऱ्यांमार्फत तीव्र आंदोलन किंवा जोपर्यंत शासन याबाबत ठोस उपाय उचलत नाही तोपर्यंत साखळी उपोषण केले जाणार असल्याचे तहसीलदार कार्यालयासमोर हे आंदोलन छेडले. जाईल असा देखील इशारा निवेदन दिलेल्या पत्रामध्ये मंडणगड तालुका शहर व्यापारी संघटनेने नमूद केले आहे. रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा सावित्री नदीवरील आंबेत पूल सर्व वाहनांसाठी पुलाच्या दुरुस्तीकरिता बंद ठेवून तब्बल १२ कोटी रुपये खर्च करून हा पूल दोन वर्षांपासून दुरुस्ती करण्यात आला होता.