मुले घडवीत सामाजिक भान जपणारे आदर्श शिक्षक अनिल शिंदे
कान्हूर मेसाई ता. शिरुर येथील विद्याधाम माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात मुलांना शिक्षणाचे धडे देत माजी विद्यालयाच्या माध्यमातून विद्यालयाचा कायापालट करणारे आणि समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून सामाजिक भान जपणारे आदर्श शिक्षक म्हणजे प्राचार्य अनिल पोपटराव शिंदे यांना रोज नागरिकांच्या भावनेतून शब्दरूपी वेगवेगळे पुरस्कार मिळत शेकडो विद्यार्थ्यांसह समाजामध्ये त्यांनी त्यांचे अढळ स्थान निर्माण केले आहे.
कान्हूर मेसाई ता. शिरुर येथील विद्याधाम माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अनिल शिंदे यांच्या घरातच शिक्षकी वारसा होता. त्यांचे वडील वडील कै. पोपटराव शिंदे हे हाडाचे शिक्षक तर त्यांचे बंधू प्रा. अशोकदादा शिंदे हे शारीरिक शिक्षण संचालक त्यांनतर ६ जुलै १९८८ रोजी अनिल शिंदे हे सदर वारसा जतन या विद्याधाम हायस्कूलमध्ये उपशिक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर याच गावातील प्राथमिक शिक्षिका मंगल तळोले यांच्याशी विवाहबद्ध झाले. मात्र शिक्षकी पेशा हा व्यवसाय नसून एक धर्म आहे या जाणिवेने ते सतत कार्यमग्न राहिले. त्यांनतर अध्यापन सह समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना प्रगतीकडे झेप घेण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या भूमिकेतून रात्री १२ वाजेपर्यंत रात्र अभ्यासिका त्यांनी चालविली त्यामुळे त्यांनी इंग्रजीचा निकाल त्याकाळी १०० टक्के लावला आणि त्यांची कन्या प्रियांका ही इंग्रजी विषयात ९४ टक्के गुण मिळवून पुणे विभागात प्रथम तर गुणवत्ता यादीत १२ वी आली. दरम्यान विद्यार्थी हित जपता जपता शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनिल शिंदे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था स्थापन केली. युवकांना मार्गदर्शन म्हणून शिवकृष्णाई प्रतिष्ठानची स्थापना केली. तसेच या माध्यमातून शेतकऱ्यांना मध्यम मुदत व पीक कर्जाचे वाटप केले. गुणवंत विद्यार्थ्यांसह सेवाभावी संस्थांचे यामाध्यमातून सत्कार करून त्यांना बळ दिले. संघर्ष समिती स्थापन करून जेथे अन्याय होईल तेथे ठामपणे उभे राहण्याचे काम केले, त्यांच्या कार्याची दखल घेऊन तत्कालीन पालकमंत्री शशिकांत सुतार यांनी त्यांना संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजनेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली देत तालुका पुनर्विलोकन समितीचे सदस्यपदी देखील त्यांना संधी देण्यात आली. तर १ जानेवारी २०२१ सदर विद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळत अनेक माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने विद्यालयाचा चेहरामोहरा बदलून टाकला. तर ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यालयात ग्रामपंचायत कान्हूर मेसाई व विद्या विकास मंडळाच्या माध्यमातून अभ्यासिका उपलब्ध करुन दिली असून विद्यालयात अनेक उपक्रम राबवत विद्यार्थी हित जोपासले.
समाजातील अनेक घटकांनी माझ्याकामाची कायम दखल घेऊन मला प्रोत्साहन दिले हाच माझा सर्वोच्च पुरस्कार असल्याची भावना प्राचार्य अनिल शिंदे यांनी व्यक्त केली असून माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी विद्यार्थी व समाजासाठी झटत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
शब्दांकन - शेरखान शेख