खेड पोलीस स्थानकात आपल्या 17 वर्षीय पुतण्याचे चोरानी अपहरण केले असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली खास पोलीस पथक स्थापन करून मुलाला शोधण्यात पोलिसांनी यश मिळवले. मात्र या मुलाचे कोणतेही अपहरण झाले नसून त्याला बारावीच्या शिक्षणात स्वारस्य नसल्याने त्याने हा स्वतःच अपहरण झाल्याचा बनाव रचल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या मुलाला समुपदेशन करून सुखरूप नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.
याबाबत ९ तारखेला 17 वर्षांच्या आपल्या पुतण्याचे अपहरण झाल्याची फिर्याद खेड पोलीस स्थानकात नोंदवण्यात आली होती. आपल्या पुतण्याचा फोन आला होता. त्यावेळी त्याने घाबरलेल्या आवाजात आपणाला चोरट्यांनी परजिल्ह्यात पकडून नेले असून मी कशीबशी सुटका करून घेतली आहे. आता एका ठिकाणी आश्रय घेतल्याचे त्याने फोनवरून सांगितले होते. त्यानंतर त्याचा संपर्क तुटला होता. तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक गडदे यांनी वरिष्ठांना याबाबत कळवल्यानंतर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक निर्माण करून मुलांचा शोध शेजारील जिल्ह्यात घेण्यात आला. शेजारील जिल्ह्यातील हॉटेल्स, लॉजेस विश्रामगृह येथे शोध घेत असताना मुलाचा शोध लावण्यात रत्नागिरी पोलिसांना यश देखील आले. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतल्यानंतर मुलाकडे चौकशी केली असता आपणाला बारावीच्या शिक्षणात रस नसून आयटीआयचे शिक्षण घ्यायचे होते. मात्र आपण घरातील लोकांना सांगू शकत नव्हतो त्यामुळे आपण परजिल्ह्यात निघून गेलो व चोरट्यानी पळविल्याचा बनाव केला, असे मुलाने पोलिसांना सांगितले. यावेळी मुलाचे वय लक्षात घेता व त्याचे पुढील भवितव्य लक्षात घेऊन पोलिसांनी या मुलांचे योग्य ते समुपदेशन केले. तसेच या मुलाला नातेवाइकांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन बजावलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.