उत्तर प्रदेश: रस्त्यावरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीच्या पुढील चाकामध्ये एक वानर अडकल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियामवर व्हायरल होत आहे. वानर चाकामध्ये अडकल्याचा व्हिडीओ पाहताना तुमचे मन देखील विचलित होऊ शकत.

अनेकवेळा वाहन चालवताना अचानक वाहनासमोर आलेल्या वेगवेगळ्या प्राण्यांमुळे अनेक अपघात होतात. या अपघातांमध्ये अनेकवेळेला गाडीचालकांसह त्या प्राण्यांना देखील आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे वाहन चालवताना योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना सतत वाहतूक प्रशासनाकडून करण्यात येत असतात.

मात्र, आपण कितीही काळजी घेतली तरीही काही अपघात हे टाळता येत नाहीत. अशाच एका भयानक अपघाताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशमधील बाराबंकी बदोसराय येथे रस्ता पार करत असणारे एक वानर त्या रस्त्यावरुन जाणाऱ्या भरधाव दुचाकीखाली आल्याने ते गाडीच्या चाकात पुर्णपणे अडकले. गाडी चालकाने प्रसंगावधान राखत ब्रेक लावल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरीही या अपघातामध्ये वानराचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

दरम्यान, हा अपघात पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शिनी सांगितलं की, वानर रस्ता पार करण्याच्या तयारीत असतानाच एक भरधाव दुचाकी त्या रस्त्यावरुन आली आणि वानर दुचाकीच्या पुढील चाकामध्ये पुर्णपणे अडकले. उपस्थित लोकांच्या मदतीने चाकात अडकलेल्या वानराची सुटका करण्यात आली आणि चाकातून सुटका होताच वानराने तेथून पळ काढला. मात्र, गाडी चालकाने वेळेवर ब्रेक लावला नसता तर मोठा अनर्थ घडला असता असंही त्यांनी सांगितलं.

वानराला वाचवताना मृत्यू...

याआधी देखील झाशीमध्ये गाडीसमोर आलेल्या वानराला वाचवण्याच्या नादात कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ती खड्यात पलटी झाली होती. या अपघातामध्ये चार जण जखमी तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.