मुंबई: पत्रा चाळ घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना आज जामीन मंजूर झाला आहे. संजय राऊतांना जामीन मंजूर होणं, हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासा असल्याचं बोललं जात आहे. अशातच संजय राऊत यांच्या भांडुपमधील घराबाहेर शिवसैनिकांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. दुपारी 3 वाजता शिवसैनिकांकडून संजय राऊतांच्या घराबाहेर जल्लोष साजरा केला जाणार आहे. अशातच संजय राऊत यांच्या मातोश्रींची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्य "माझा मुलगा येतोय... आनंद आहे...", असं त्या म्हणाल्या आहेत.

संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्याची बातमी मिळताच त्यांच्या मातोश्रींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले होते. त्यांच्या घराखाली जल्लोषाची तयारी सुरु होती. संजय राऊतांच्या मातोश्री घराच्या खिडकीपाशी येऊन सगळं पाहात होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी चिंता आता दिसत नव्हती. मात्र, डोळ्यांत आनंदाश्रू तराळले होते. 100 दिवसांपासून कारागृहात असलेला मुलगा अखेर घरी परतणार याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. त्या आतुरतेनं वाट पाहत होत्या. यावेळी पाणावलेल्या डोळ्यांनी "माझा मुलगा येतोय... आनंद आहे...", असं संजय राऊत यांच्या मातोश्री म्हणाल्या.

राऊतांना अटक झाल्यानंतर त्यांचं आणि त्यांच्या मातोश्रींचं भावनिक नातं सर्वांसमोर आलं होत. जुलै महिन्यात संजय राऊतांच्या घरी छापेमारी करत ईडीनं त्यांना अटक केली होती. त्यावेळीही ईडी अधिकाऱ्यांसोबत घराबाहेर पाय ठेवण्यापूर्वी संजय राऊतांनी आईला कडकडून मिठी मारली होती. तो क्षण पाहून अवघा महाराष्ट्र भावूक झाला होता.

तुरुंगात असताना कोर्टाच्या बाकड्यावर बसून संजय राऊतांनी आपल्या आईला एक भावनिक पत्र लिहिलं होतं. न्यायालयीन कोठडीत असलेल्या खासदार संजय राऊत यांनी कोर्टाच्या बाकड्यावरुन आईला भावनिक पत्र लिहलं होतं. पक्ष वाचवण्यासाठी लढावंच लागेल, असा उल्लेख त्यांनी पत्रात केला होता. तसेच, मी येईनच. तोपर्यंत उद्धव ठाकरे आणि शिवसैनिक तुझी मुलं असतील, असंही राऊतांनी पत्रात म्हटलं होतं. राऊतांच्या पत्राची चर्चा सोशल मीडियावर झाली होती.

संजय राऊतांना जामीन मंजूर होताच कोर्ट परिसरात टाळ्यांचा कडकडाट

संजय राऊतांना जामीन मंजूर होणं हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासा असल्याचं बोलल जात आहे. एवढच नाहीतर संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर सर्वसामान्यांमध्येही आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. संजय राऊत यांना जामीन मिळताच कोर्टात देखील टाळ्यांचा कडकडाट झाल्याचं पाहायला मिळालं. इतिहासात कोर्टात पहिलांदाच असं चित्र पाहायला मिळाल्याची चर्चा सुरु आहे. तब्बल 100 दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र ईडीनं (ED) कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. ईडीच्या मागणीवर दुपारी 3 वाजता कोर्ट आपला निकाल देणार होत.