पुणे: शेतात तुटून पडलेल्या विद्युत वाहिनीवर पाय पडून विजेचा धक्का लागल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली. मंगळवारी (दि. ८) पिंपळगाव जोगा (ता. जुन्नर) येथे शेतात फवारणी करत असताना ही घटना घडली. याबाबतची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार पोलीस हवालदार ए. के. भवारी यांनी दिली.
याबाबतची अधिक माहिती देत असताना भवारी यांनी सांगितले की, शेतकरी किसन धोंडीबा कोकणे (वय ६४) रा. पिंपळगाव जोगा, ता. जुन्नर हे आपल्या घराजवळच्या शेतात फवारणी करिता गेले होते. यावेळी शेतात खाली पडलेल्या विद्यूत वाहिनीवर त्यांचा पाय पडला. दरम्यान त्यांना विजेचा धक्का बसला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
जवळच्याच शेतात काम करणारे बाबू चंद्रकांत सस्ते व इतर ग्रामस्थांनी कोकणे यांना ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र तेथील आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत गोविंद किसन कोकणे यांनी ओतूर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार डी. एन. धादवड हे करीत आहेत.