रत्नागिरी: माजी पंचायत समिती सदस्याला मजगाव रोड भागात भर रस्त्यामध्ये चोपल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या मारहाणीला राजकीय किनार आहे की वैयक्तीक वाद आहेत हे समजू शकलेले नाही. मात्र एका राजकीय नेत्याबद्दल फेसबुकवर एक पोस्ट केल्याच्या रागातून ही मारहाण झाल्याचे समजते; मात्र याबाबत कोणतीही तक्रार सायंकाळी उशिरापर्यंत दाखल नसली तरी राजकीय वातावरण काहीसे तापले आहे.

शहरातील आयसीआयसीआय बँकेशेजारी तीन दिवसांपूर्वी हा मारहाणीचा प्रकार घडला. . काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे आणि शिंदे सेना यांच्यात राजकीय चढाओढ सुरू आहे. सोशल मीडियावर तशा पोस्टही व्हायरल होत होत्या. माजी पंचायत समिती सदस्यानेही सोशल मीडियावर सत्ताधारी पक्षातील नेत्याबद्धल पोस्ट केल्याचे बोलले जाते. त्या रागातून त्या नेत्याच्या समर्थकाने माजी सदस्याला भररस्त्यात मारहाण केली, अशी चर्चा सुरू आहे. या नेत्याच्या कानशिलात लावत, पाठलाग करून त्याला मारहाण करण्यात आली. चित्रपटात शोभेल अशाप्रकारे रस्त्यात पाठलाग करून मारहाण झाल्याने बघ्यांची चांगलीच गर्दी झाली होती. त्यानंतर काही स्थानिकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवत दोघांना बाजुला केले; मात्र या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यामध्ये माजी पंचायत समिती सदस्याला मारहाण करताना दिसत आहेत.