नाशिक: बहिणीला सासरी सोडण्यासाठी भगुर शिवारात मगंळवारी (दि. ८) रोजी सकाळी आला होता. हा मुळ हिंगोलीचा रहिवाशी आहे. या युवकाला अज्ञात व्यक्तीने अमानुषपणे मारहाण करत ठार मारल्याची घटना रात्री उघडकीस आली. गणेश पंजाब पठाडे (वय २६) रा. शिरसम, हिंगोली असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
देवळाली कॅम्प पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गणेश पठाडे हा त्याच्या बहिणीला भगुर येथे सोडण्यासाठी आला होता. सकाळी नाश्ता केल्यानंतर तो घराबाहेर पडला. मात्र संध्याकाळपर्यंत पुन्हा घरी परतलाच नाही. दरम्यान संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भगुर-देवळाली कॅम्प रस्त्यावर एक युवक बेशुद्धावस्थेत बेवारसपणे पडल्याची माहिती देवळाली कॅम्प पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले.
गणेश पठाडे यास पोलिसांनी वाहनातून त्वरित लॅमरोडवरील देवळाली छावणी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तेथे काही वेळ प्रथमोपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे लक्षात येताच वैद्यकिय अधिकाऱ्यांनी पोलिसांना त्यास जिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगितले. तत्काळ देवळाली छावणीच्या रुग्णवाहिकेतून गणेशला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयाच्या अतीदक्षता अत्यावश्यक कक्षात त्याच्यावर उपचार सुरू असताना वैद्यकिय अधिकाऱ्यांनी रात्री मयत घोषित केले. गणेशची बहिणी प्रज्ञा कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रात्री उशीरापर्यंत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात संशयित हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
संशयित हल्लेखोराची ओळख पटली असुन देवळाली कॅम्प पोलिसांसह गुन्हे शाखांची पथके त्याच्या मागावर असल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक कुंदन जाधव यांनी सांगितले. मारेकऱ्याने कुठल्याही हत्याराचा खूनासाठी वापर केलेला प्रथमदर्शनी आढळून येत नाही. केवळ लाथाबुक्क्यांसह काही तरी टणक वस्तूने बेदम मारहाण गणेशला केली. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज जाधव यांनी व्यक्त केला आहे.