रत्नागिरी : मागील १४ वर्षांपासून रखडलेला मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी कोकणवासीय एकवटले असून येत्या काही महिन्यात जनआक्रोश आंदोलनाद्वारे महामार्ग विभागासह राज्य सरकाराला जाब विचारत घेराव घालण्याचा निर्धार विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

पनवेल ते इंदापूर मार्गावर बहुतांश ठिकाणे खड्डेमय असल्याने प्रवासी वर्गाचे हाल होत आहेत. त्यातच काही ठिकाणी कामे अर्धवट असल्याने प्रवास करताना ब्रेक लागत असल्याने कोकणातील अनेक रहिवासी सोशल मिडियाद्वारे एकत्र येत महामार्गाच्या गलथान कारभाराबाबत येणाऱ्या महिन्याभरात जनआक्रोशच्या खाली आंदोलन छेडणार आहेत. कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता कोकणातील अनेक नागरिकासह मुंबई ठाणे प्रवास करणारे नागरिक या आंदोलनात भाग घेण्याची शक्यता आहे.

महामार्गाबाबत सर्वसामान्य नागरीक महामार्ग विभाग व सत्ताधारी पक्षाला विविध प्रश्नावर जाब विचारला जाण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे काही मागण्या मांडण्यात येणार आहेत. या मध्ये महामार्ग बनविताना चांगल्या दर्जाचा असावा व सदर महामार्गात पाच वर्षात काहीही समस्या उद्भवणार नाही व यापुढे खड्डेमुक्त असेल अशा दर्जाचा असावा.

सदर महामार्गात जमीन हस्तांतर विषय लवकरात लवकर निकाली काढूननुकसानग्रस्तांना योग्य मोबदला व त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, न्यायालयीन कचाट्यात अडकलेल्या महामार्गबाबत लवकरात लवकर योग्य ते निर्णय घेण्यात यावा. रस्त्यावर पडलेले खड्डे न बुजवता सध्या वापरात असलेला महामार्ग उत्तमदर्जाचा करून मिळावा. कार्पेट टाकून खड्डे बुजवून जनतेचा पैसा पाण्यात न घालवता मलमपट्टी करून देऊ नये. खराब महामार्गांवर सरकारच्या चुकीमुळे अनेक जिव गेलेले आहेत. यापुढे कोणत्याही व्यक्तीचा जीव सरकारमुळे गमवावा लागला असेल तर त्याला शासनाकडून अपघात निधी मिळावा. याआधी आपल्या कोकणकरांनी विविध संघटनानी आंदोलन केलेली आहेत.

मे २३ पूर्वी काम पूर्ण व्हावे

या सर्व गोष्टी करण्यासाठी १४ वर्ष उलटली, अजून किती वर्ष लागतील याचा काही अंदाज नाही. उशीर होणार असेल तर वर्षानुवर्षे वापरात असलेला व सध्या शासनाच्या अखत्यारित असलेला महामार्ग १ मे २०२३ पूर्वी खड्डेमुक्त व वापरण्यायोग्य मिळावा अशी मागणी समाजमाध्यमाद्वारे होत आहे.