रत्नागिरी : मुंबई- गोवा महामार्गावरील हातखंबातील अपघात प्रवण क्षेत्र असलेल्या अवघड वळणावरील वाहनांच्या धडकेमुळे रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेली आरसीसी संरक्षणभित पूर्णतः कोसळून गायब झालेली आहे. तर दुसऱ्या बाजूची संरक्षणभित ढासळलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे.
काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री कोकण दौऱ्यावर येण्यापूर्वी एका दिवसात कोसळलेल्या ठिकाणी छोट्या लोखंडी पाईप टाकून तात्पुरत्या स्वरूपाची रेलिंग उभारण्यात आले होती. मात्र या अवघड वळणाच्या ठिकाणी अजूनही पूर्वीप्रमाणे मजबूत संरक्षणभित न उभारता रेलिंगचे कुंफन दिसून येत आहे. या वळणावरून वाहनचालक जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करत आहेत.
जीवघेण्या वळणावर यापूर्वी अनेक ट्रक आरसीसी संरक्षण भिंत तोडून ३० ते ३५ फूट खोल ओढ्यात पडून अपघात झालेले आहेत. सदर लोखंडी रेलिंगवर एखादा दुचाकीस्वार जरी आधळला तरीही सहजरित्या रेलिंग मोडून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वळणावर आरसीसी संरक्षणभित उभारणे गरजेचे आहे. मात्र संबधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
हातखंब्यातील वळणाच्या ठिकाणी मातीची रेवा देखील रस्त्यावर आलेली पाहायला मिळते. या अवघड वळणाच्या आजूबाजूला घरे आहेत. वळनावरील संरक्षण भिंतच गायब झाल्याने रात्रीच्या वेळी एखादे ब्रेकफैल वाहन सरळ दरीत जाऊन मोठा अपघात होऊ शकतो. महामार्ग बांधकाम विभागाने या रस्त्याच्या चौपदीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला किमान भीषण अपघात रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्याची आवश्यकता आहे. हातखंबातील हे अवघड वळण कायम अवजड वाहनचालकांची मोठी डोकेदुखी ठरत असते. धोकादायक अशा अपघात प्रवण वळणावर वाढलेली झाडी व तुटलेली संरक्षण भिंत तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी वाहनचालकामधून होत आहे.
दुसऱ्या बाजूचा कठडा ही ढासळला
या अवघड वळणावरील दुसऱ्या ही बाजूचा संरक्षक कठडा ढासळून पडला आहे. भिंत ढासळलेल्या ठिकाणी खोल दरी असून त्या भागात सद्या दिवसरात्र दाट धुके असल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे. उपाययोजना हाती न घेतल्यास रस्तावरून सहज वाहनचालक खोल ओढ्यात पडून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. ढासळलेल्या कठड्याचा भाग आणखी वाढू नये याची खबरदारी सार्वजनिक बांधकाम विभाग कशा प्रकारे घेणार हे पाहावे लागणार आहे.