रत्नागिरी : मच्छिमारांना आपत्तीचे व्यवस्थापन या विषयाचे महत्व ओळखून भाट्ये येथील मासेमारांना रिलायन्स फाउंडेशन, भाट्ये मच्छिमार सेवा सहकारी संस्था,भाट्ये व नागरी संरक्षण केंद्र रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळेचे भाट्ये येथे आयोजन करण्यात आले होते. 

मच्छिमारी हा व्यवसाय खूप जोखमीचा आहे. वर्षानुवर्षे मासेमार करताना मासेमारांना समुद्रामध्ये विविध आपत्तीना तोंड द्यावे लागते. हृदय विकाराचा झटका येणे, बोटीवरून पाण्यात पडून बुडणे इत्यादी आपत्तीमध्ये आपत्तीचे व्यवस्थापन कसे करावे. याबाबत शास्त्रीय माहिती मासेमारांना असणे गरजेचे आहे. जेणेकरून आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मदत होते अथवा कमी करता येते. 

या कार्यक्रमामध्ये रत्नागिरीच्या नागरी संरक्षण दलाचे सहाय्यक उपनियंत्रक मिलिंद जाधव यांनी समुद्रामध्ये मच्छिमारांना हृदय विकाराचा झटका आल्यास व पाण्यात बुडाल्यास, मासेमारांना हाताळायच्या विविध शास्त्रीय पद्धती प्रात्यक्षिकासहित समजावून सांगितल्या तसेच कृत्रिम श्वासोश्वास, CPR म्हणजे हृदय विकाराचा झटका आलेल्या रुग्णाला कृत्रिम श्वासोश्वासवासाद्वारे दिलासा कसा द्यावा, याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच मच्छिमारांना प्राथमिक उपचार कसे द्यावेत याबाबत माहिती देण्यात आली.सदर कार्यशाळेस भाट्ये मच्छिमार सहकारी संस्थेचे सेक्रेटरी अरमान भाटकर यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच परिसरातील मच्छिमारांनी आपत्ती प्रशिक्षणास उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 

यावेळी रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे, कार्यक्रम सहाय्यक चिन्मय साळवी, नागरी संरक्षण केंद्र रत्नागिरीचे उपनियंत्रक मिलिंद जाधव, सहाय्यक उपनियंत्रक आदी उपस्थित होते.