संगमेश्वर : देवरुखातील महालक्ष्मी गॅस एजन्सीच्या तक्रारी आणि नुकतेच उघडकीस आलेले गॅस चोरी प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी महालक्ष्मी गॅस एजन्सीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गॅस चोरी प्रकरण एजन्सीला महागात पडले आहे. संबंधित गॅस एजन्सीवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

फणसवणे येथील गॅसची चोरी झाली होती. आता जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालत महालक्ष्मी गॅस एजन्सीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळाल्याचे बोलले जात आहे. गरिबाच्या गॅस सिलेंडरची चोरी करणाऱ्यावर कारवाई होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

सविस्तर वृत्त असे की, संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे येथे घरगुती वापरासाठीच्या सिलेंडरमधील गॅसची चोरी करताना दोघांना फणसवणे ग्रामस्थांनी पकडले होते. ग्रामस्थांनी एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी तहसीलदारांकडे केली होती. ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहून तहसीलदार थोरात यांनी ताबडतोब नायब तहसीलदार दिगविजय पंडित यांना पाठवून गाडी ताब्यात घेण्यास सांगितले. त्यानंतर गाडी देवरुख तहसीलदार कार्यालयात आणण्यात आली आहे. गाडी व सिलेंडर जप्त करण्यात आले.सिलेंडरचे वजन करण्यात आले असता काही कमी वजनाचे असल्याचे उघड झाले होते.

या प्रकरणाचा अहवाल तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. याबाबतच अहवाल सोमवारी देवरूख तहसील कार्यालयाला पुन्हा प्राप्त झाला. देवरुख येथील महालक्ष्मी गॅस एजन्सीवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी सातारा येथील एजन्सीचे समन्वयक प्रभात कुमार यांना दिल्याची माहिती तहसील कार्यालयातून प्राप्त झाली आहे.