खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील त्या अवघड वळणावरील अपघाताची मालिका थांबता थांबत नाही. चार दिवसांपूर्वी एल पी जी गॅस वाहून नेणाऱ्या टँकर पलटी होऊन अपघात घडल्याची घटना ताजी असतानाच आज त्याच वळणावर ओली मासळी वाहून नेणाऱ्या कंटेनर पलटी होऊन अपघात झाला. चालकाचे केवळ दैव बलवत्तर म्हणून चालक या जीवघेण्या अपघातातून बचावला.
सोमवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीतून मुंबईकडे ओली मासळी घेऊन जाणाऱ्या कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने हा महाकाय कंटेनर त्या अवघड वाळणावरील संरक्षक भिंतीला आदळून पलटी झाला. या अपघातात चालकांच्या केबिनच्या पूर्णतः चक्कचुर झाला मात्र तरीही चालक या जीवघेण्या अपघातातून सहीसलामत बचावला. भोस्ते घाटात त्या अवघड वळणावर वारंवार होणारे जीवघेणे अपघात लक्षात घेत महामार्ग बांधकाम विभागाने या ठिकाणी कायस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र बांधकाम विभागाकडून तशी कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याने आणखी किती अपघात झाल्यावर बांधकाम विभागाला जाग येणार आहे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. या संदर्भात रात्री उशिरापर्यंत खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.