मुंबई: पतीच्या निधनाची बातमी कळताच, पत्नीनेही प्राण सोडले असल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या विक्रोळी पूर्व परिसरात घडली. विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये ही दुर्देवी घटना घडली. पती आणि पत्नीचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. विनू कोशी आणि प्रमिला कोशी अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्नमवार नगरमध्ये राहत असलेले विनू कोळी यांची सोमवारी अचानक तब्येत खराब झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी विक्रोळी टागोरनगर मधील क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात उपचार सुरु असताना विनू यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी विनू यांना मृत घोषित केले.

दरम्यान, प्रमिला यांना पतीच्या निधनाची दु:खद वार्ता समजली. पतीचे निधन झाल्याचं कळताच, प्रमिला यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच प्रमिला यांचीही प्राणज्योत मालवली होती. एकाच दिवशी पती पत्नीचा मृत्यू झाल्याने विक्रोळी कन्नमवार परिसरात शोकांतिका पसरली आहे. या घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.