दापोली : तालुक्यातील आंजर्ले खाडीत इरफानिया मोहल्ल्यालगत 2 वर्षे बंद अवस्थेत असलेल्या ‘चंद्रावती’ या 6 सिलिंडर नौकेला शनिवारी रात्री लागलेल्या आगीत बोट पूर्ण जळून खाक झाली.
दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वेळीच आग आटोक्यात आणल्याने बाजूला असलेल्या इतर नौका सुरक्षित राहून मोठी दुर्घटना टळली. हर्णे बंदरात जेटी नसल्यामुळे आंजर्ले खाडीकिनारी अनेक मासेमारी नौका डागडुजीसाठी आणल्या जातात. यापैकी काही नौका बंद अवस्थेत याच ठिकाणी ठेवण्यात येतात. अशाच नयन पावसे यांच्या चंद्रावती या बंद नौकेला शनिवारी रात्री आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केलेले पाहून इरफानिया मोहल्ला व जुईकर मोहल्ल्यातील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे आग इतरत्र न पसरल्याने बाजूला उभ्या असलेल्या नौकांचा धोका टळला.
या आगीत चंद्रावती बोटीचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. शासनाने दुर्घटनाग्रस्त नौकामालकास भरीव मदत करावी, अशी मागणी मच्छीमार संघटनेने केली आहे. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल मच्छीमार संघटनेसह सर्वांनी आभार मानले आहेत.