पाथरी ता . (प्रतिनिधी)आ. बाबाजानी दुर्राणी यांच्याविरोधात मागील काही दिवसांपासून भाजपाकडून अपप्रचार सुरू असून केवळ व्यक्तिगत द्वेषातून व आ.दुर्राणी हे मुस्लिम असल्याने भाजपाकडून विरोध व सुडाचे राजकारण चालू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला .
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून आ . दुर्राणी यांच्या विरोधात देण्यात आलेल्या निवेदना चे खंडन करत आमदार दुर्राणी यांच्या समर्थनार्थ बाजु मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पाथरी तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने रविवार 06 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वा. एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी तालुकाध्यक्ष एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलत होते .यावेळी कृऊबास चे मा . सभापती अनिलराव नखाते , जि.म. बँकेचे संचालक दत्तराव मायंदळे , मा.जि.प.सदस्य चक्रधर उगले,सुभाषराव कोल्हे, मा . सभापती माधवराव जोगदंड , राजेश ढगे , पी.आर शिंदे , नारायण आढाव ,मा . नगराध्यक्ष नितेश भोरे , मा . नगरसेवक आलोक चौधरी , राकाँ शहराध्यक्ष सुनिल उन्हाळे, राकाँ युवक शहराध्यक्ष शेख खालेद , राकाँ युवक तालुकाध्यक्ष विष्णू काळे , सरपंच श्याम धर्मे , नितिन शिंदे , राकाँ आयटीसेल जिल्हाध्यक्ष अमोल भालेपाटील , सरपंच वैजनाथ महिपाल , विक्रम गायकवाड अहेमद अत्तार , लिंबाजी मिर्जे , एजाज खान , केशव बागल , भागवत गायकवाड , शाकेर सिद्दीकी , मुख्तार अन्सारी , डिंगाबर लिपणे आदी राकाँ पदाधिकार्यांची उपस्थिती होती .
पुढे बोलताना तालुकाध्यक्ष एकनाथ शिंदे म्हणाले की , पाथरी पंचायत समितीचा मी सभापती असताना बीओटी तत्त्वावर पंचायत समिती गाळ्यांचे बांधकाम राज्य शासनाकडून मंजुरी आल्यानंतर व त्यानंतर टेंडर सुनील कोहिनूर इफ्रास्ट्रक्चरला सन 2010 मध्ये आमंत्रण देत देण्यात आले .दरम्यान तत्कालीन आमदार मीराताई रेंगे यांच्याकडून या जागेवरील बांधकामा संदर्भात कोर्टाकडून स्टे आणण्यात आला . पुढे कोर्टाकडून स्थगिती उठवण्यात आली .परंतु यासंदर्भात आता माजी आमदार मोहन फड ही आरोप करत आहेत . 2014 ते 2019 दरम्यान ते विधानसभेचे आमदार होते . त्यावेळी ते झोपले होते का ? असा प्रश्न यावेळी तालुकाध्यक्ष शिंदे यांनी केला .आ .दुर्राणी यांनी लिंगायत समाजाला स्वतंत्र स्मशानभूमी देऊन संरक्षक भिंत बांधून दिली आहे .राहिला प्रश्न बाबा टावर जागेचा या जागेवर कोणतीही स्मशानभूमी नव्हती . केवळ आ . दुर्रानी यांचा नावे एक प्लॉट गृहनिर्माण संस्थेत होता व बाजूला 1 एकर वेगळी खरेदी केलेली जमीन होती .याच ठिकाणी 27 लोकांच्या नावे आजही स्वतंत्र प्लॉट आहेत .आधी रेसिडेन्शिअल झोन असणारा हा परिसर रितसर परवानगी घेऊन कमर्शियल झोन तयार करण्यात आले आहे. या जागे संदर्भातही भाजपाकडून चुकीचा अपप्रचार चालू आहे असे ते म्हणाले .
आठवडी बाजार संदर्भात बोलताना ते म्हणाले की , मराठवाड्यातील सर्वात मोठा आठवडी बाजार आ . दुर्राणी यांनी उभारला असून या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या सोयीसुविधासाठी गाळ्याची उभारणी करण्यात आलेली आहे व भविष्यात कोल्ड स्टोरेज उभारत भाजीपाला साठवणूक करता येणार आहे .लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी या ठिकाणी व्यापाऱ्यांची बैठक घेत टप्प्याटप्प्याने डिपॉझिट भरण्यासंदर्भात चर्चा केली परंतु याही संदर्भात चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे .शहरातील एनए लेआउट मधील रिकाम्या जागा यांच्या विषयी करण्यात आलेल्या आरोपात संदर्भात भाष्य करताना शिंदे म्हणाले की , शहरात केवळ नृसिंह कॉलनी एनए लेआऊट असुन याठिकाणी ओपन स्पेस मध्ये नगरपालिकेकडून लोकहित पाहत जलशुद्धीकरण केंद्र व शाळेसाठी जागा देण्यात आलेली आहे.त्यामुळे हेही आरोप तथ्यहीन असल्याचे सांगितले .