पुणे: पिंपरी- चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील एक बडा नेता भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची पिंपरी चिंचवड मधील एका बड्या नेत्याने त्यांची सदिच्छा भेट घेतली. शिरुर लोकसभा मतदारसंघातील हा बडा नेता असून लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील आणि संबंधित नेत्याची बैठक असून त्यावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघातील काही दिग्गज नेते आणि माजी नगरसेवक व मोजके प्रभावी कार्यकर्ते उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील यांच्या सोबत झालेल्या बैठकीत आगामी महापालिका निवडणुका यांच्यासह शहरातील विकास कामाबाबत सविस्तर चर्चा झाली असून राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा मुहूर्त शोधण्याची तयारी सुरु झाली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये संघटनात्मक बदल केल्यानंतर पक्षांतर्गत दुफळी उफाळून आली. विद्यमान शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास ज्येष्ठांना "अनकम्फर्टेबल" वाटत आहे. त्यामुळे ज्येष्ठ विरुद्ध विद्यमान पदाधिकारी असा छुपा संघर्ष गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीतील पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात महत्त्वाचा "रोल" असलेले राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याच्या कारणामुळे नाराजी वाढली असून, मानपान नाट्यामध्ये राष्ट्रवादीतील दुफळी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच राष्ट्रवादीच्या सुरू असलेल्या चिंतन शिबिरामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे अनुपस्थित असल्यामुळे अगोदरच राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. आता शिरूर मधील बडा नेता भाजपच्या गळाला लागल्यास निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा फटका बसणार, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

दरम्यान, भोसरी मतदार संघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी सुद्धा आज चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्यासोबत विलास लांडे हे देखील राष्ट्रवादीवर नाराज आहेत का ? अशी चर्चा देखील शहरात रंगली आहे. येत्या काही दिवसात पिंपरी चिंचवडमधील काही नगरसेवकांचा गट भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुत्रांकडून माहिती समोर आली आहे.