[ रत्नागिरी /प्रतिनिधि ]
शहरातील आठवडा बाजार येथील पान टपरीसमोरील दुचाकी बाजुला केल्याच्या रागातून बाप-लेकांना लोखंडी रॉडने मारहाण व शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सात जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही घटना शनिवार, ६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
विपूल नागवेकर, मुन्ना नागवेकर, ईशांत नागवेकर, अंकित मयेकर (तिन्ही रा. मुरुगवाडा कावळवाडी, रत्नागिरी) आणि तीन अज्ञात अशा एकूण सात जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात स्वप्निल नरेंद्र गावखडकर (रा. रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्यांची आठवडा बाजार येथील जोशिला वाईन मार्टसमोर पान टपरी आहे. शनिवारी सायंकाळी ४.३० वा. सुमारास त्यांच्या पान टपरी समोर संशयितांच्या तीन दुचाकी अस्ताव्यस्त लावून ठेवलेल्या होत्या.
दरम्यान, सायंकाळी ५ वा. पान टपरीसमोर पाणी बॉटलची गाडी आल्याने फिर्यादीचा भाऊ सुरज हा त्या दुचाकी बाजुला करत असताना एक संशयित तिथे आला. त्याने तू माझ्या गाडीला हात का लावलास असे विचारून अंगावर गेला. त्यावेळी फिर्यादी स्वप्निल गावखडकरने त्याला वाद कशाला करताय असे विचारले असता संशयित तिथून फोनवर बोलत गेले.
काही वेळाने संशयित पुन्हा तिथे आले आणि त्यांनी फिर्यादीचा भाऊ सूरजला मारहाण करण्यास सुरुवात केली. म्हणून स्वप्निल आणि त्याचे वडील नरेंद्र गावखडकर हे दोघे गेले असता त्यातील तीन अज्ञातांनी या दोघांना धरून ठेवले. तर ईशांत नागवेकर, अंकित मयेकर या दोघांनी त्यांना हातांच्या ठोशांनी मारहाण केली.त्यानंतर मुन्ना नागवेकरने फिर्यादी स्वप्निलच्या डोक्यात लोखंडी रॉड तर विपुल नागवेकरने एक किलो वजनाचे लोखंडी वजन त्याच्या डोक्यात मारून दुखापत केली. तसेच तुम्हाला बघून घेईन, असे म्हणत आणि ठार मारण्याची धकमी दिली.
याप्रकरणी सात संशयितांविरोधात शहर पोलिस ठाण्यात भा. दं. वि. कायदा कलम १४३,१४७,१४८, १४९,३२४, ३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.