शिरुर: सहकार चळवळीत चढउतार होत असतात. शेतकऱ्यांच्या मालकीची कारखाना हीच एकमेव संस्था आहे. येथेच शेतकरी अधिकाराने बोलू शकतो. सध्या निकोप स्पर्धा राहिलेली नाही. ९० टक्के साखर ही सहकारी साखर कारखान्यात होत असते. परंतु आता ४५ टक्के साखर तयार होते. सहकारी कारखानदारी आता अडचणीत आहे. ती टिकण्यासाठी मोदी सरकार प्रयत्न करत आहे. सरकारने ५ टक्केवरुन २० टक्के इथेनॉल वापरण्यास परवानगी दिलेली आहे. सहकाराच्या माध्यमातून दहशत पसरवली जात आहे. राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे त्यामूळे न घाबरता घोडगंगात परिवर्तन करा. तरच तुम्ही स्वावलंबी होणार आहात असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

मांडवगण फराटा येथे शुक्रवार (दि 4) रोजी घोडगंगा किसान क्रांती पॅनलच्या सांगता सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, राजकारणात पश्चातापाला संधी नसते. ही निवडणुक तुमच्या भवितव्याशी निगडित आहे. त्यामूळे पष्छतापाची वेळ येऊ देऊ नका." असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.         

यावेळी बोलताना माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील म्हणाले, "सात वर्षांपूर्वी आपण सर्वांनी घोडगंगात परिवर्तन करण्यासाठी पदयात्रा काढली होती. साखर कारखान्याच्या निवडणुकीत व इतर निवडणुकीत फरक आहे.कारखान्याचा विषय आपल्या चुलीशी निगडित आहे. शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. त्यामूळे न घाबरता सत्ता परिवर्तन करा. तुम्हाला जेथे अडचण येईल तेथे मदत करण्यासाठी आम्ही आहोत. सहा तारीख तुमच्या आयुष्याचे परिवर्तन करणारी आहे. त्यासाठी संपूर्ण पॅनेलला निवडून द्या."

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद म्हणाले "ही निवडणूक सर्वांनी गांभीर्याने घ्यावी. शाश्वत विकास व भौतिक विकास यात फरक आहे. आता जर तुम्ही चुकला तर भविष्यात उस उत्पादक शेतकरी शिल्लक राहणार नाही. मागील २५ वर्षात चेअरमन अशोक पवार यांनी खुप काम केले आहे आता त्यांना आराम द्या. म्हणून आता तुम्ही परिवर्तनाला साथ द्या.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब भेगडे, आमदार राहुल कुल, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, निवृत्ती गवारी, दादा पाटील फराटे, सुधीर फराटे, ॲड. सुरेश पलांडे, बाळासाहेब घाडगे, पाराजी गावडे, भगवानराव शेळके, रामभाऊ सासवडे, गणेश भेगडे, राजेंद्र कोरेकर, आबासाहेब गव्हाणे, आदी मान्यवर उपस्थित होते