मुंबई: जेवणात खोबरे सर्रास वापरले जाते, खोबऱ्याचा मसाला, चटणी यांमुळे खाद्यपदार्थ अधिक चविष्ट होतात. त्यातही ओल्या खोबऱ्याचा वापर केल्याने जेवणाची चव आणखी वाढते. पण ओले खोबरे नारळातून वेगळे काढण्यासाठी खूप त्रास होतो, म्हणजे ते इतके घट्ट असते की चाकू किंवा इतर वजनदार गोष्टीने त्यातून खोबरे वेगळे काढावे लागते. यासाठी गृहिणींना किंवा स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला खोबरे काढण्याची आधीच तयारी करावी लागते. यासाठी एक कल्पना वापरुन नारळातून खोबरे सहजरित्या वेगळे काढता येईल, याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी सुप्रिया साहू यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नारळातून खोबरे वेगळे काढण्याची भन्नाट कल्पना सांगितली आहे. सर्वात आधी नारळाचे दोन भाग करावे, त्यानंतर बाहेरच्या बाजूने त्यातील एक भाग गॅसवर ठेवा, थोडावेळ गरम झाल्यानंतर ते थंड पाण्यात ठेवा. यामुळे खोबरे सैल होईल आणि ते नारळाच्या वाटीतून सहज बाजुला काढता येईल. ही पद्धत व्हिडीओमध्ये दाखवण्यात आली आहे ही भन्नाट कल्पना नेटकऱ्यांना आवडली आहे.