रत्नागिरी : सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अधिकारी व राजकीय प्रतिनिधी यांच्यापर्यंत थेट पोहोचविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे, जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी - रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत सभागृह येथे आयोजित जनता दरबारामध्ये ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. किर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन श्रीमती शुभांगी साठे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नंदिनी घाणेकर आदी उपस्थित होते.

 जनता दरबारामध्ये पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जनतेच्या अडचणी सोडविणे हे माझे प्राधान्यक्रम असून आज जनता दरबाराच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेकडो जनसामान्यांच्या अडचणी जाणून घेता आल्या याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. जनता दरबारामध्ये प्राप्त झालेल्या अर्जांवर अधिकाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा आढावा दर आठ दिवसानी घेण्यात येईल. आजच्या जनता दरबाराप्रमाणे दर महिन्याला जनता दरबाराचे आयोजन जिल्ह्यातील अन्य तालुक्यामध्ये करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांनी देखील जनतेच्या अडचणींचे निराकरण संबंधित स्तरावर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रशासकीय कामकाजाच्या समस्या सोडविण्यासाठी डिस्ट्रीक डॅशबोर्ड ही यंत्रणा सुरु करण्यात येणार आहे. सदर यंत्रणा सुरु करणारा रत्नागिरी हा राज्यातील पहिला जिल्हा असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली.

       आजच्या जनता दरबारात अंदाजे 400 अर्ज प्राप्त झाले. सदरचे अर्ज नगरपालिका, महावितरण, महसूल, क्रीडा, कामगार, वनविभाग, कृषि, शिक्षण, आरोग्य, गृह, मेरीटाईम बोर्ड, रोजगार हमी योजना इत्यादी विभागांशी संबंधित होते.

      

यावेळी जिल्हा परिषद केंद्रशाळा लोटेमाळ या शाळेला स्वच्छ विद्यालय प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. महिला व बाल विकास विभागाच्या माझी कन्या भाग्यश्री या योजनेच्या लाभार्थी वैष्णवी सूरज पानकर, भैरवी सचिन भोळे, शांभवी सचिन भोळे यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम, मत्स्य, कृषि, आरोग्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती व अन्य विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.