चिपळूण : शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. शेकडो शिवसैनिकांनी चिपळूण पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत पोलिसांनाच घेराव घातला. 

नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांच्या चिथावणीमुळेच हल्ल्याचा प्रयत्न झाला, असा आरोप करत शिवसैनिकांनी नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच, रात्री हा प्रकार होऊनही पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही, याचा निषेध करत शिवसैनिकांनी पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली.

भास्कर जाधव यांची सुरक्षा तातडीने वाढवण्याची मागणीही शिवसैनिकांनी केली आहे. चिपळून पोलिस स्टेशनमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. पोलिसांनी तातडीने याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करावी व युद्धपातळीवर तपास करावा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.

अद्याप गुन्हा दाखल नाही

शिवसैनिकांनी पोलिसांना सांगितले की, राणे कुटुंब व भास्कर जाधव यांच्यातील संघर्षातूनच मध्यरात्री हा हल्ला झाला आहे. भास्कर जाधवांविरोधात नितेश राणे चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत. त्यामुळे आमचीच फिर्यादी म्हणून नोंद करत नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. अद्याप पोलिसांनी या हल्लाप्रकरणात कोणाविरोधातही गुन्ह्याची नोंद केलेली नाही. त्यावर शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे चिपळूणमध्ये तणाव निर्माण झाला आहे.