रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या माथेरान पर्यटनस्थळ येथील रायगडची कन्या असलेल्या कुमारी हर्षा विनोद शिंदे हिने मिस हेरिटेज इंडिया हा किताब पटकवल्यानंतर तीला मिसेस व मीस हेरिटेज इंटरनॅशनल स्पर्धेत मिस गटाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असुन ती पुढील पंधरा दिवसांमध्ये थेट मलेशिया येथे होणाऱ्या मिसेस व मीस हेरिटेज इंटरनॅशनल स्पर्धेत सहभागी होणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान येथील रायगडची कन्या कुमारी हर्षा विनोद शिंदे हिच्या यशामुळे माथेरानचे नाव साता समुद्रा पलिकडे पोहचणार आहे. 

         14 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत कौलालमपूर येथे होणारी स्पर्धा ही मिस व मिसेस युनिव्हर्स प्रमाणेच असून या स्पर्धेतील सादरीकरण मात्र वेगळे असते. भारतामध्ये यश मिळवल्यानंतर आता तरुणांची आयडॉल असलेली हर्षा भारतीय परंपरा घेऊन थेट आंतरराष्ट्रीय मंचावरती त्याचे सादरीकरण करणार असल्याने तिला समस्त माथेरानकरांकडुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सिंगापूर येथील एका मोठ्या कंपनीचे प्रायोजकत्व प्राप्त असलेल्या या स्पर्धेसाठी मृणाल गायकवाड या भारताच्या संचालक म्हणून काम पाहत आहेत. स्पर्धेत जगभरातील जवळपास तीस हून अधिक देशातील स्पर्धक सहभागी होणार असून त्यात प्रामुख्याने रशिया, चीन, जपान, युक्रेन, पाकिस्तान, न्यूझीलंड सारख्या प्रगत देशांचाही समावेश आहे.

      माथेरान सारख्या दुर्गम ठिकाणी फॅशनच्या जगतामध्ये हर्षाला प्रोत्साहन देणाऱ्या श्री.विनोद शिंदे व रेश्मा शिंदे या दांपत्यांचेही सर्वत्र कौतुक होत असून व्यवसायाने हॉटेल व्यवसायिक असलेले विनोद शिंदे यांनी हर्षाची आवड ओळखून तिला तिच्या आवडत्या व्यवसायात करिअर करण्याची मुभा दिली. त्यामुळेच हर्षाने बॅचलर ऑफ आर्किटेक मुंबई युनिव्हर्सिटी येथून घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी लंडन येथे जाऊन मास्टर इन आर्किटेक अँड डिझाईनचा अभ्यास पूर्ण केला आहे. 2021 मध्ये तिला विनर ऑफ द मिस इंडिया व बेस्ट पर्सनॅलिटी विनर इन 2021 हे किताब मिळाले होते. आपल्या शिक्षणाबरोबरच आपली आवड सांभाळताना हर्षाने भरतनाट्यम, वास्तु पेंटिंग, लेखन व निसर्ग पेंटिंग यामध्येही आपला हातखंडा दाखवून दिला आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर माथेरानची कन्या देशाचे प्रतिनिधित्व करणार असल्याने माथेरान तसेच कर्जत तालुक्यातून हर्षाचे कौतुक होत असून हर्षा नक्कीच या स्पर्धेत यश प्राप्त करेल असे हर्षाची आई रेश्मा यांनी सांगितले हर्षा ही माथेरानच्या माजी नगरसेविका वासंतीताई जांबळे यांची नात आहे