खेडमधील जगबुडी नदीमध्ये शुक्रवार 4 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास एक मृतावस्थेत मगर आढळली. ही मगर 9 फूट लांबीची आहे. वनविभागाने मृत मगरीवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत शवविच्छेदन करून नदीच्या किनारीच दहन केले.
सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी एक महाकाय मगर जगबुडी नदीवर भरतीच्या पाण्यात तरंगताना दिसली. अनेकांना मगरीला पाहताच भीती वाटली. त्यानंतर ही मगर हालचाल करत नसल्याचे लक्षात आल्यावर जागरूक नागरिकांनी वनविभागाला कळवले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या मगरीला नदीच्या काठावर आणले. ही मगर 9 फूट लांबीची होती. या मगरीचे वय अंदाजे 8 वर्ष असल्याची माहिती वनविभागाने दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मगरीला जेसीबीच्या साहाय्याने काठावर काढले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जंगले यांनी शवविच्छेदन करून पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मगरीला नदीच्या काठावरच मगरीचे दहन करण्यात आले.