फोंडा: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मडगाव पोलिस मुख्यालयात काम करणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलला फोंडा पोलिसांनी अटक केली आहे. हा पोलिस कॉन्स्टेबल पणसुले-पिळये, धारबांदोडा येथील रहिवासी असून त्याचे नाव विजय रोहिदास गावणेकर (28) असे आहे.

गावणेकर याने अल्पवयीन मुलीशी मैत्री करुन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडल्याने या परिसरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पीडित मुलगी इयत्ता दहावीत शिकत आहे. मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर त्वरित विजय गावणेकर याला अटक करण्यात आली. याकामी फोंड्यातील एका स्वयंसेवी संस्थेने पोलिसांना सहकार्य केले.

गावणेकर याने पीडितेशी मैत्री करून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. बलात्कारानंतर भेदरलेल्या मुलीची मानसिक अवस्था पाहून मुलीच्या वडिलांनी पोलिस स्थानकात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार फोंडा पोलिसांनी विजय गावणेकर याच्या मुसक्या आवळल्या. पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.