खेड : भोस्ते मार्गावर जगबुडी नदीच्या पुलानजीक एका अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे एका कोल्ह्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी घडली. जंगलातून पाणी पिण्यासाठी रस्ता ओलांडून नदीच्या दिशेने जाताना या कोल्ह्याला अज्ञात वाहनांची ठोकर बसली आणि त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. रस्त्यात मृत झालेल्या कोल्ह्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्याचे शवविच्छेदन केले.

वाहन चालकांच्या ही बाब लक्षात आली. अनेकांना हा श्वान असल्याचा भास झाला. त्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केले. मात्र, काही प्राणी मित्रांना हा कोल्हा असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याचे फोटो तालुका वनपाल सुरेश उपरे यांना पाठवले. त्यांनी हा कोल्हा असल्याचे सांगितल्यानंतर वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविण्यात आले. मृत कोल्ह्याचे विच्छेदन करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत कोल्ह्याला ताब्यात घेतले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर कोल्ह्याचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे स्पष्ट होणार आहे.