केज :- केज शहरातून आणि परिसरातून मोटार सायकल।चोरीच्या घटना वाढत होत्या परंतु पोलिसांनी प्रयत्न करूनही चोर ताब्यात येत नव्हते; मात्र एका घटनेत मोटार सायकल चोराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे तर एक आरोपी फरार आहे.
बुधवार दि २ ऑक्टोबर रोजी बीड येथीलमेहबुबखान अमितखान पठान हे त्यांची पॅशन प्रो-मोटार सायकल क्र. (एम एच-२३/बी-१३३६)वरून बीडकडे जात असताना ते केज येथील बस स्टँडवर अनिल भोजनालय येथे जेवण करण्यासाठी थांबले होते. त्यांनी त्यांची मोटार सायकल अनिल भोजनालया समोर उभी करून ते जेवण करण्यासाठी हॉटेलात गेले. जेवण संपल्या नंतर त्यांनी बाहेर येवुन पाहीले असता त्यांची मोटार सायकल तेथे नसल्याचे आढळले. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला परंतु मोटार सायकल आढळून आली नाही. म्हणूम त्यांनी बीड येथील त्यांचे मित्र पत्रकार अभिमन्यू होळकर यांच्याशी संपर्क साधला. पत्रकार अभिमन्यू होळकर यांनी महेबूबखान पठाण यांना मोटार सायकल चोरीची पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला दिला. महेबूबखान पठाण हे बस स्टॅंड पासून पोलीस स्टेशनकडे तक्रार देण्यासाठी जात असताना त्यांना वाटेत तीन इसमांनी गाठून मोटार सायकल आम्ही शोधून देतो त्यासाठी ५ हजार रु. द्या अन्यथा मारून टाकू किंवा जखमी करू. अशा धमक्या देत पैशाची मागणी केली.
सदर तीन इसम हे माहेबूबखान पठाण यांना पोलीस स्टेशन समोर धमक्या देऊन पैशाची मागणी करीत चोरीची तक्रार देण्या पासून परावृत्त करन्याचा प्रयत्न करीत होते.
दरम्यान पत्रकार अभिमन्यू होळकर यांनी ही माहिती केज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांना दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनीही माहिती विविध गुन्ह्यांचा तपास लावण्यात आणि गुन्हेगारांना अलगद उचलून आणण्यात माहिर असलेले दबंग पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना देत तात्काळ कारवाई करून चोरांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले.
प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे यांना सोबत घेऊन चोरट्यांनी पकडण्यासाठी सापळा रचला. पोलीस ठाण्याच्या परिसरात ते दबा धरून बसले. पोलीस अधिकारी चोरट्यांच्या सर्व हालचालीवर नजर ठेवून होते मात्र चोरट्यांना पोलिसांचा संशय येताच ते पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना स्वतः सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे यांनी पाठलाग करून आरबाज नसीर खुरेशी, रईस हारुन मुल्ला त्यांच्यावर झडप घालून दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या तर पाप्या उर्फ जुबेर मुस्ताक फारोकी एकजण फरार झाला आहे.
चोरट्यांना पोलिसी खाक्या दाखवितात त्यांनी चोरी केलेली मोटार सायकल पोलिसांच्या ताब्यात दिली. चोरीला गेलेली मोटार सायकल केज पोलिसांनी अवघ्या दीड तासात ताब्यात घेत दोघांना चोरांना जेरबंद केले आहे.
या प्रकरणी महेबूबखान पठाण यांच्या तक्रारी वरून आरबाज नसीर खुरेशी, रईस हारुन मुल्ला आणि पाप्या उर्फ जुबेर मुस्ताक फारोकी सर्व रा. केज यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ५०६/२०२२ भा. दं. वि. ३७९, ३८५ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे हे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान आरबाज नसीर खुरेशी, रईस हारुन मुल्ला आणि पाप्या उर्फ जुबेर मुस्ताक फारोकी यांना न्यायालयाने दि. ५ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.