रत्नागिरी : कोकणात दरवर्षी पडत असलेल्या मुसळधार पाऊस आणि त्यामुळे शहरांमध्ये शिरत असलेलं पुराचे पाणी यामुळे दरवर्षी समस्या निर्माण होते आणि लाखो रुपयांच्या नुकसान होतं त्यामुळे यावर्षी या नद्यांचे पुनरूज्जीवन करताना त्यांची गाळमुक्ती करण्यासाठी केेंद्रीय स्तरावर राबविण्यात येणार्या नदी संवर्धन अमृत उपक्रमात कोकणातील 34 प्रमुख नद्यांचा समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमात रत्नागिरी जिल्ह्यातील वाशिष्ठी नदीसह आठ नद्याही गाळमुक्त होणार आहेत.
अनेक वर्षांपासून कोकणातील नद्यांमध्ये गाळ साचल्याने बहुतांश जिल्ह्यात पावसाळ्यात पूरस्थिती उद्भवते. मात्र गेल्या वर्षभरात चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी नदीचा गाळ उपसा केल्यानंतर यंदाच्या पावसाळ्यात निर्माण झालेली पूरस्थिती आटोक्यात आणि नियंत्रणात होती. चिपळूणचा हा गाळ उपसा पॅटर्न आता केंद्र शासनाने मान्य केला असून याद्वारे कोकणातील सर्वच प्रमुख नद्या गाळमुक्त करण्यात येणार आहे.
केवळ गाळमुक्ती न करताना त्यांचे संवर्धन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नदी संवर्धन अमृत उपक्रमात या नद्यांचा समावेश करण्यात आला आहे. औद्योगिक विकास प्रक्रियेत नद्यांची धोक्यात आलेली शुद्धता जपण्यासाठी पाणी शुध्दीकरणाला या उपक्रमात प्राधान्य देण्यात येणार आहे.
उपक्रमात रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, वाशिष्ठी, सोनवी, काजळी, कोदवली, शास्त्री, मुचकुंदी, बावनदी या नद्यांचा समावेश करण्यात आला आहे.