ठाणे: पाच वर्षांच्या चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या २५ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजार धर्माला काळिमा फासणारी ही घटना ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा भागात घडली आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र नराधम फरार झाला असून त्याच्या शोधात पोलिसांचे पथके रवाना करण्यात आले आहे.
कुटुंबासोबत होती जवळीक
आरोपी नराधम पीडित कुटुंबाचा बराच काळ मित्र होता. त्यामुळे पीडिता त्याला ओळखत होती. तो मजुरीचे काम करत इतर पाच सहकाऱ्यांसोबत पीडित मुलीच्या घरापासून २० मीटर अंतरावर एका खोलीत राहायचा, तो अनेकदा पीडित मुलीच्या घरी जायचा आणि कधी कधी पीडितेच्या आई-वडिलांना कामानिमित्त बाहेरगावी जावे लागल्यावर तिची काळजी घेत असे. टॅक्सी चालक म्हणून काम करणाऱ्या पीडित मुलीच्या वडिलांनी आरोपी नराधमाला नोकरीच्या शोधात मुंबईत आल्यापासून अनेकवेळा मदत केल्याने पीडितेच्या आईवडिलांचा त्याच्यावर विश्वास होता.
नराधमाचे विकृत कृत्य
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घरात पीडितेची आई झोपल्याचे पाहून आरोपीने पीडित मुलीला सोबत फिरण्याच्या बाहण्याने नेले. त्यावेळी घरानजीकच्या झुडपात पीडितेला घेऊन गेला. मात्र त्यावेळी काही लोकांनी त्याला पीडित मुलीसोबत फिरत असलेल्या पाहिले. त्यामुळे झाडाझुडपात इतर लोकांना पाहून बलात्काराचा प्रयत्न करु शकला नाही. त्यातच तो राहत असलेल्या खोलीत त्याचे सहकारी नसल्याचा फायदा घेत, पीडित मुलीला स्वतःच्या खोलीत नेले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिला एकटे सोडून घटनास्थळावरून पळून गेला.
असा आला प्रकार लक्षात
दरम्यान, पीडित मुलीच्या आईने मुलीचा शोध सुरू केला असता, ती आरोपीच्या घराजवळ रडत असतानाच, तिच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव होत असल्याचे आईला आढळून आले. आईने ताबडतोब पीडित मुलीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता पीडित मुलीवर बळजबरीने बलात्कार झाल्याचे समोर आले. त्यानंतर कल्याण तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिली.
आरोपीचा शोध सुरु
पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, अन्य 5 सहकारी मित्रांसोबत खोलीत राहणाऱ्या आरोपीने घटनेनंतर तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. आरोपीच्या शोधासाठी पोलिस अधिकाऱ्यांची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. तर पीडित मुलीवर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले.