वाघोलीतील सिद्धार्थनगर येथे एका डॉक्टरने अनधिकृत हॉस्पिटल चालवत रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याने त्याच्यासह आठ जणांवर पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अ‍ॅड. नरेंद्र आनंद वाघमारे (वय 33, रा. वाघोली, पुणे) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हा प्रकार 2014 ते फेब्रुवारी 2022 या दरम्यान वाघोलीतील न्यू मातोश्री मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल याठिकाणी घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपींनी डॉ. शशिकांत निकम आणि डॉ.विद्यानंद भिल्लारे यांच्याशी संगनमत करून वाघोली परिसरात 2014 पासून न्यू मातोश्री मल्टिस्पेशालिस्ट नावाचे अनधिकृत हॉस्पिटल सुरू केले. सदर हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या जीवितास व आरोग्यास धोका निर्माण होईल, असे हयगयीचे कृत्य करून नागरिकांची, तसेच शासनाची फसवणूक केली. तसेच, तक्रारदार नरेंद्र वाघमारे यांनी या हॉस्पिटलविरोधात केलेल्या तक्रारीचा राग मनात धरून साथीदारांच्या मदतीने संशयित आरोपींनी तक्रारदार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याने संबंधित आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पुढील तपास लोणीकंद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन पवार करीत आहेत.