शिरुर: आपल्या देशाचे सैनिक हे जिवावर उदार होऊन मृत्यूची कसलीही तमा न बाळगता सीमेवर डोळ्यात तेल घालुन आपल्या देशाच रक्षण करतात. त्यांच्यामुळेच आपण दिवाळी तसेच इतर अनेक सण मोठया उत्साहात साजरा करतो. त्यामुळे सैनिक हेच आपल्या देशाचे खरे हिरो असुन दिवाळीच्या सुट्टीतही देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांच्या घरी जाऊन त्यांच्या सन्मानासाठी समस्त हिंदू आघाडीच्या वतीने सैनिक सन्मान दिवाळी हा सोहळा शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील 40 गावामध्ये पार पडल्याचे मिलिंद एकबोटे यांनी शिरुर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दरवर्षी देशातल्या विविध भागात जाऊन सैनिकांसोबत जाऊन दिवाळी साजरी करतात. त्यांचीच प्रेरणा घेऊन सन 2016 साला पासुन समस्त हिंदू आघाडीच्या वतीने प्रत्येक वर्षी जे सैनिक सध्या देशासाठी कर्तव्य बजावत आहेत. त्या सैनिकांसोबत किंवा त्यांच्या कुटुंबासोबत दिवाळी सण साजरा केला जातो. या वर्षीच्या सैनिक सन्मान दिवाळी सोहळ्याची सुरवात पुणे येथील दिव्यांग कर्नल राकेश मेहता यांच्या घोरपडी येथील घरापासुन करण्यात आली.

अशी असते सैनिक सन्मान दिवाळी...

प्रथम सैनिकांच्या घराला मंगलतोरण बांधून घराच्या पुढे पणत्या प्रज्वलित करुन रांगोळी काढली जाते. त्यानंतर समस्त हिंदू आघाडीचे कार्यकर्ते रोहित आढाव हे सुरेख नगारा वादन करतात. त्यानंतर सैनिकांच्या कुटुंबातील व्यक्तींना मिठाई वाटप केलं जात. त्यामुळे संबंधित कुटुंबालाही आनंद होतो. यावर्षी 22 ते 27 ऑक्टोबर दरम्यान पुणे जिल्ह्यासह शिरुर तालुक्यातील 40 गावातील सुमारे 200 परिवारांपर्यंत पोहचून सैनिक सन्मान दिवाळी सोहळा साजरा करण्यात आला.

पुणे जिल्ह्यातील खराडी, चंदननगर, घोरपडी, आव्हाळवाडी तर शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी, टाकळी भिमा, विठ्ठलवाडी, वढू खुर्द, वढू खुर्द, धामारी, मांडवगण फराटा, आलेगाव पागा, निर्वी, गोलेगावं पारोडी, वडनेर, खैरेनगर, निमगाव भोगी, पिंपरखेड आदी 40 गावांमध्ये सैनिक सन्मान दिवाळी साजरी करण्यात आली.

या उपक्रमासाठी मिलिंद एकबोटे, तुकाराम डफळ, बापु काळे, नवनाथ निचित आणि अजिंक्य तारु यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली. तसेच स्वामी गौड, रोहन लांडगे, सुमंत शेळके, विलास एसकर, विक्रम निचित, सुरज रजपूत आणि मातृशक्ती संघटनेच्या सारिका वारुळे, मनिषा मोरे, चारुलता काळे, सारीक सोडळ यांनी महत्वाचे योगदान दिल्याचे मिलिंद एकबोटे यांनी सांगितले.