चिपळूण :पूरमुक्त चिपळूणसाठी वाशिष्टी व शिवनेरीतील पहिल्या टप्प्यातील उर्वरित व दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी चिपळूण बचाव समितीने प्रांताधिकारी व प्रभारी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

चिपळूण बचाव समितीतर्फे पूरमुक्त चिपळूण करण्याकरिता व चिपळूणच्या कपाळावरील निळी व तांबडी रेषा उतरविणेकरिता डिसेंबर २०२१ रोजी जन आंदोलन केले होते. या आंदोलनास तत्कालीन महाराष्ट्र शासनाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून जानेवारी २०२२ रोजी वाशिष्टी नदीमधील गाळ काढण्याकरिता प्रत्यक्ष काम सुरु केले होते. जानेवारी ते जून २०२२ या कालावधीमधे जलसंपदा विभागातर्फे अर्थखात्याच्या सहाय्याने पेठमाप उक्ताड़ व बहादूरशेख पूलाचे परिसरातील गाळ काही प्रमाणात काढला गेला. जूननंतर पावसाळ्यामुळे हे काम बंद झाले होते.

आता पावसाळा संपला आहे. त्यामुळे या पहिल्या टप्प्यातील उर्वरीत काम त्वरित हाती घेणे आवश्यक आहे. सदरील काम १५ नोव्हेंबरपूर्वी सुरू करण्यात यावे. तसेच चिपळूण शहर व आजूबाजूचे गावांमधे वारंवार येणाऱ्या पुरामुळे होणाऱ्या हानीला रोखण्यासाठी व या परिसरावरील निळी व तांबडी रेषा खाली उत्तरविणेकरिता, किंबहुना रद्द करणेकरिता मेरी टाईम बोर्ड, जलसंपदा खाते, अर्थ खाते, वन खाते आदि विभागांनी नियोजनबद्ध काम करणे अत्यंत आवश्यक आहे. या कामांचे नियोजन व प्रत्यक्ष कामाची कार्यवाही चिपळूण बचाव समितीने या निवेदनाद्वारे केली आहे. सदरील निवेदन प्रांताधिकारी प्रवीण पवार व प्रभारी तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्याकडे देण्यात आले आहे. यावेळी समितीचे बापू काणे, किशोर रेडीज,उदय ओतारी आदी उपस्थित होते.