नागरिकांच्या तक्रारी,अर्ज व निवदने याचा जलद गतीने निपटारा व्हावा यासाठी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.वाशिम, मालेगाव, रिसोड तालुक्यासाठी जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे २२ जानेवारी २०२३ आणि कारंजा,मानोरा व मंगरूळपीर तालुक्यासाठी जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे ५ फेब्रुवारी २०२३ रोजी समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.अर्जदारांनी घ्यावी ही विशेष काळजी: ● अर्ज मुद्देसुद व नेमकेपणाचा असावा.● अर्जासोबत आवश्यक साक्षांकित कागदपत्रे जोडावीत. अर्जावर मोबाईल क्रमांक (शक्यतो व्हाट्सअॅप) व ईमेल आयडी टाकावा.तहसिल कार्यालयात अर्ज केल्यानंतर टोकन क्रमांक प्राप्त करुन घ्यावा व शिबिराच्या दिवशी सोबत आणावे. नागरिकांच्या तक्रारी,अर्ज, निवेदने इत्यादी संदर्भात नागरिकांनी दिनांक 07 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर या कालावधी दरम्यान तहसिल कार्यालयात दाखल करावयाचे आहेत.तहसिल कार्यालयात ह्या तक्रारी,अर्ज, निवेदने स्विकारण्यासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आलेली आहे. कोणत्याही विभागाच्या तक्रारी तहसिल कार्यालयातील स्वतंत्र कक्षामध्ये नागरिकांना करण्याची मुभा आहे.अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रासह त्यांचा मोबाईल क्रमांक व ईमेल आयडीसुध्दा अर्जावर नमूद करावा असे आवाहन करण्यात येत आहे. तहसिल कार्यालयात प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी तहसिल कार्यालयातून सदरच्या तक्रारी,अर्ज, निवेदने संबंधित विभागाकडे तहसिलदार यांचे मार्फत पाठविण्यात येणार असून अशा तक्रारींचा निपटारा ९ डिसेंबर पर्यंत सर्व जिल्हा व तालुका प्रशासनाने कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस यांनी दिले आहे.नागरिकांनी सर्व कागदपत्रांसह तक्रारी, अर्ज व निवेदने तहसील कार्यालयातील समाधान शिबिरासाठी तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र कक्षामध्ये दाखल कराव्यात. प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तालुकास्तरीय यंत्रणेंकडून तहसील कार्यालयात उत्तर प्राप्त झाल्यानंतर त्या उत्तराची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयातही प्राप्त होणाऱ्या तक्रारी, अर्ज व निवेदनासंदर्भात आढावा घेण्यात येणार आहे अर्जदाराला त्याचा अर्ज दाखल केल्यानंतर तहसील कार्यालयातून एक टोकन क्रमांक मिळणार आहे. समाधान शिबीराच्या वेळी हा टोकन क्रमांक सोबत आणणे बंधनकारक आहे. समाधान शिबिरादरम्यान अर्जदाराला प्रत्यक्ष पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांचे समक्ष बोलवण्यात येणार आहे. त्यांच्या तक्रार अर्जांवर संबंधित विभागाला उत्तर द्यावे लागणार असून समाधान शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस यांनी केले आहे.