हा संघर्ष आजचा नसून गेल्या अडीच वर्षापासून सुरू आहे. एम. आय. डी. सी. च्या नोटीस आल्यापासून लोकांमध्ये एक आक्रोश निर्माण झाला होता. हा खूप संवेदनशील विषय असल्यामुळे आक्रमक स्वरूपाचा पवित्रा लोकांनी घेतला. सगळ्यांच्या सहकार्याने आंदोलनात्मक भूमिका घेऊन संघर्ष सुरू केला आहे. जो प्रकल्प महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यातील मुरुड आणि रोहा मध्ये प्रास्तावित करण्यात आला होता. तो बर्ड रथ पार्क प्रकल्प आमच्या सगळ्यांच्याच आंदोलनामुळे आक्रोशामुळे शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे हिमाचल प्रदेश मध्ये गेला. त्यामुळे तो आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. परंतु आज पुन्हा एकदा आताच्या उद्योग मंत्र्यांनी हा प्रकल्प रायगड जिल्ह्यामध्ये आणणार अशी घोषणा केली. त्याला आमचा विरोध आहे. त्यांना विनम्रपणे सांगायचे आहे की, साहेब जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या एम.आय.डी.सी.च्या संपादनाचा आपण अभ्यास जर केलात तर संपादन झालं, जमिनी गेल्या, शेतकऱ्यांनी पैसे घेतले, पैसे संपले. कारखाना न आल्यामुळे रोजगार सुद्धा उपलब्ध झाला नाही. अशा परिस्थितीमध्ये लोकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. अलिबाग तालुक्यातील शहापूर- धेरंड, उसर-खानाव परिसर असेल माणगाव मधील वेळ परिसर असेल अश्या वेगवेगळ्या ठिकाणी तीच परिस्थिती आहे. ज्या ठिकाणी भूसंपादन करून ठेवलेली जागा आहे. अशा ठिकाणी आपण प्रकल्प आणावा. आमच्या पिकत्या जमिनी, घरे-दारे, वाड्या-वस्त्या उध्वस्त करून तुम्हाला प्रकल्प आम्ही आणू देणार नाही." असा निर्धार ऍड.महेश मोहिते यांनी अलिबाग येथील एम.आय.डी.सी. विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चाला संबोधित करताना व्यक्त केला.

भूमिपुत्र संघर्ष संघटना मुरुड यांच्यावतीने अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी ऍड. महेश मोहिते, जनार्दन भगत, राजेश सुतार, सुनील घाग व 14 गाव संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते. "आमचाच मासा, आमचाच खोसा एम आय डी सी गळ टाकतोय कसा", "हमारा नेता कैसा हो महेश मोहिते जैसा हो", "शेतकरी एकजूटीचा विजय असो", "जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची", "जय जवान जय किसान" अशा घोषणांनी अलिबाग परिसर दुमदुमून गेला होता.

शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता मनमानी करणाऱ्या प्रशासना विरोधात व जबरदस्ती लादण्यात येणाऱ्या एमआयडीसी प्रकल्प विरोधात हा धडक मोर्चा ऍड.महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. मुरुड तालुक्यातील वाघुळवाडी, आमली, एसदे, शिरगाव, वळके, सातिरडे,ताडगाव, ताडवाडी, चोरडे, सावरोली, तळे, तळेखार शिवगाव अशी परिसरातील 14 गावातील हजारो लोकांनी उपस्थिती दाखवून पाठिंबा दर्शविला. या मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या धडक मोर्चा रॅलीने डी.के.टी. शाळा बायपास पासून

 शिवाजी चौक, रायगड बाजार, मयूर बेकरी मार्गे कोकण एज्युकेशन सोसायटीचे एंडस्ट्रिल हायस्कूल येथे आल्यानंतर सभेत रूपांतर झाले. 

त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रायगड यांच्या कार्यालयात जाऊन निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.